
मुंबई (अक्षय मंकणी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे मुंबईत आले आहेत. काल ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी गेले होते. पण ही भेट होऊ शकली नाही, नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिलीय. “अजितदादांकडून काही निरोप नव्हता. मी माझ्या मतदारसंघातील विविध कामांसाठी मुंबईत आलो होतो. मी काही मंत्र्यांना भेटलो सुद्धा. मी दिवसभर मंत्रालयात होतो. अतिवृष्टीचे पैसे आलेले नाहीत. त्या बद्दल मदत आणि पूर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना निवदेन दिलं तसच मतदारसंघातील विविध कामांची निवेदन देण्यासाठी दादांकडे गेलो होतो” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले.
“संध्याकाळी दादा घरी आहेत असं कळलं म्हणून गेलो होतो. त्यावेळी ते आजारी आहेत. दवाखान्यात गेलेत असं सांगण्यात आलं. मला वाटलं घरी भेट होईल, म्हणून थांबलो होतो. नंतर तिथे त्यांच्या आमदारांची बैठक सुरु होणार होती, तेव्हा तिथून निघालो” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले. दादा देवगिरीवरच होते, त्यांनी भेट नाकारली का? या प्रश्नावर “भेट नाकारण्याइतपत प्रेम कमी झालं नसाव” असं प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिलं. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा 35 पर्यंत पोहोचलाय, त्यावर प्राजक्त तनपुरे म्हणाले की, “मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शासन व्यस्त आहे. त्यांना सत्ता टिकवायची आहे. सोयी-सुविधांअभावी राज्यातील जनता मरतेय. खरंतर याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता”
अजित पवार यांच्या नाराजीच्या प्रश्नावर तनपुरे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “माझ्यासारख्या आमदाराला कोणाला पालकमंत्री व्हायचय? कोणाला आमदार? यात रस नाही” “जनतेचे मुद्दे सोडवायला प्राधान्य आहे. सोयी-सुविधाअभावी रुग्णांचा मृत्यू होतोय, कमी पटसंख्येमुळे सरकार शाळा बंद करण्याचा घाट घालतेय हे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत” असं प्राजक्त तनपुरे म्हणाले.