
मुंबईतील फोर्ट परिसरातील हॉर्निमन सर्कलजवळ असलेले ‘जिमी बॉय’ हे आयकॉनिक पारशी कॅफे, आपल्या 100 व्या वर्धापनदिनाच्या काही महिने आधी बंद झाले आहे. या कॅफेच्या इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे.
कॅफेची खासियत काय?
1925 मध्ये जिमी बॉयची स्थापना ‘कॅफे इंडिया’ या नावाने जमशेद आणि बोमन इराणी या बंधूंनी केली होती. 1999 मध्ये जमशेद यांचा मुलगा अस्पी इराणी यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून याचे नाव ‘जिमी बॉय’ असे बदलले. तीन पिढ्यांपासून हे कॅफे पारशी खाद्यसंस्कृती जपत आहे. कीमा पाव, बन मस्का, इराणी चहा, ऑम्लेट पाव, मावा केक आणि मावा समोसा यासारख्या पारंपरिक पारशी पदार्थांसाठी हे कॅफे प्रसिद्ध आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये या कॅफेचा शतकमहोत्सव साजरा होणार होता, पण त्यापूर्वीच ते बंद झाले.
वाचा: नाग मेल्यावर नागीण 24 तास मृतदेहाजवळ बसून राहिली अन्…; आश्चर्यचकीत करणारी घटना
काय आहे नेमकं कारण?
20 जून रोजी या चारमजली इमारतीत मोठ्या भेगा दिसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तपासणीनंतर इमारत राहण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले आणि तात्काळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. माहिमतुरा कन्सल्टंट्सच्या मागील ऑडिटमध्ये इमारतीच्या भारवाहक भिंती आणि स्लॅब्समध्ये गंभीर बिघाड असल्याचे नमूद केले होते, परंतु कोणतीही दुरुस्ती झाली नव्हती, ज्यामुळे इमारत ‘अत्यंत जीर्ण’ ठरली.
BMC ने 21 जून रोजी मुंबई महानगरपालिका कायदा 1888 च्या कलम 354 अंतर्गत मालक आणि भाडेकरूंना इमारत त्वरित रिकामी करण्याचे व पाडकाम करण्याचे आदेश दिले. यामुळे जिमी बॉयला आपले फोर्टमधील दुकान बंद करावे लागले. तसेच, कॅफेचे संचालक शेरझाद इराणी यांनी स्पष्ट केले की, हे बंद तात्पुरते आहे. माहिम येथील टेकअवे आउटलेट आणि नेव्ही नगरमधील कॅफे ऑलिव्ह ग्रीन येथे जिमी बॉयचे पदार्थ उपलब्ध आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीद्वारेही ते पारशी खाद्यपदार्थ पुरवत आहेत.
या बंदमुळे मुंबईकरांच्या आणि पर्यटकांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे. जिमी बॉयच्या चाहत्यांना आशा आहे की, कायदेशीर प्रक्रिया आणि दुरुस्तीनंतर हे कॅफे पुन्हा सुरू होईल आणि आपल्या शतकाच्या परंपरेला पुढे चालू ठेवेल.