लव्ह जिहाद फेक, हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?; जितेंद्र आव्हाड का संतापले?

| Updated on: Dec 15, 2022 | 7:31 AM

लव्ह जिहादा बाबत पत्रकारांनी आव्हाड यांना सवाल केला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लव्ह जिहाद वगैरे सर्व खोटे आहेत. घटस्फोट कुठे होत नाहीत?

लव्ह जिहाद फेक, हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?; जितेंद्र आव्हाड का संतापले?
लव्ह जिहाद फेक, हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?; जितेंद्र आव्हाड का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: आंतरजातीय विवाह करताना आता सरकारला कळवावे लागणार आहे. त्याबाबतचं एक परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. या निर्णयाच्या माध्यामातून हे सरकार जात परंपरा जपत असून वर्णवाद आणू पाहत आहे. सरकारचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? असा सवाल संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांची माहिती आधी सरकारला कळवायची. त्यानंतर सरकारी पॅनल मुलांच्या पालकांशी चर्चा करेल, अशा आशयाचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.

आंतरजातीय/धर्मीय लग्नांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला 200 वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं. जाती व्यवस्था म्हणजेच चातुरवर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे काम चालू आहे, अशी टीका जितेंद्र आ्हाड यांनी केली आहे.

 

या सरकारला वेड लागले आहे, असे मला वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहीत आहे. त्यांना हे माहीत असले पाहिजे की, महात्मा फुले यांनी यशवंत नामक ब्राम्हण मुलगा दत्तक घेतला. शाहू महाराजांनी आपल्या घरातील पहिले लग्न एका धनगराच्या घरात केले.

बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी ब्राम्हण होती. वर्णव्यवस्थेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यानंतर या महाराष्ट्रात अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत. माझा स्वत:चाही आंतरजातीय विवाह झाला आहे, असं ते म्हणाले.

आता आंतराजातीय विवाह करणार असाल तर तुम्हाला ते सरकारला कळवावे लागेल, ही कोणती पद्धत आहे? सरकारला का कळवायचे? आम्ही सज्ञान आहोत ना? जर 18 वे वर्ष आम्हाला सज्ञान घोषित करणार असाल तर आम्ही तुम्हाला का कळवायचे?, असा सवालही त्यांनी केला आहे.

या परिपत्रकामध्ये असेही म्हटलेय की सरकार मुलीच्या पालकांशी चर्चा करणार. कदाचित मुलांचे आपल्या मातापित्याशी नसेल पटणार! ही मुले आपल्या पालकांच्या मनाविरुद्ध लग्न करणार असतील. पण, त्याची माहिती घेणारे तुम्ही कोण? बर्‍याचदा आयुष्यभर मुलीशी तिचे पालक बोलत नाहीत. पण, मुलीचा संसार चांगला चालू असतो ना? संसार नावाची जी गोष्ट आहे ती मोडकळीस आणायची आहे का?, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

मंगलप्रभात लोढा यांना महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती काय माहीत आहे? हा पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी करण्याचा हा डाव आहे. 1927 ला बाबासाहेबांनी जाळलेली मनुस्मृती मागच्या दाराने हे सरकार आत आणतंय. हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय, असा आरोप त्यांनी केला.

लव्ह जिहादा बाबत पत्रकारांनी आव्हाड यांना सवाल केला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लव्ह जिहाद वगैरे सर्व खोटे आहेत. घटस्फोट कुठे होत नाहीत? असा सवाल करतानाच एकच समाज असा आहे की तो म्हणजे ख्रिश्चन! तिथे विलगतेला परवानगीच नाही. बायबलमध्ये तसे लिहिलेय, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

जेव्हा तुम्ही धर्माबद्दल बोलता ना, तेव्हा त्या त्या धर्मग्रंथांचा अभ्यास करा. त्यामध्ये काय करुन ठेवलेय ते पहा. येशूने सांगितलेय असे त्यांचे म्हणणे आहे. ते येशूच्या सूचनांचा अवलंब करतात. आपण दुसर्‍या धर्मांकडून काही शिकायचे नाही. आपला धर्म श्रेष्ठ आहे, हे सांगण्यासाठी नको ते धंदे सुरु करायचे, असा प्रकार सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.