
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना एक व्यक्ती पडली आणि जखमी झाली. त्यानंतर त्यांना तातडीने कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी रुग्णाला घरी पाठवले. पण त्यानंतर काही तासातच रुग्णालाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव डेव्हिड घाडगे असे आहे. डेव्हिड यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे डेव्हिड यांचा मृत्यू झाल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले आहेत. यापूर्वीही रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे काहींचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळ आंबिवली परिसरात राहणारे डेव्हिड घाडगे हे मुंबईतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री मुंबईहून कल्याणला परत येत असताना, कल्याण स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना ते पडले. पडल्यामुळे ते जखमी झाले. जखमी अवस्थेत असलेल्या डेव्हिड यांना त्यांचा मुलगा तुषारने तातडीने कल्याण महानगर पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी डेव्हिड यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु त्यांना रुग्णालयात ऍडमिट न करता, फक्त दुसऱ्या दिवशी येऊन एक्स-रे (X-Ray) काढण्याचा सल्ला देत घरी जायला सांगितले.
डेव्हिड यांचा मुलगा तुषारने डॉक्टरला वारंवार वडिलांना ऍडमिट करून घ्यावे अशी विनंती केली होती. मात्,र डॉक्टरांनी त्याची विनंती ऐकली नाही. त्यानंतर ते दोघे घरी निघून आले. शनिवारी सकाळी डेव्हिड यांना एक्स-रे साठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. याच दरम्यान घरी असताना डेव्हिड यांनी लघवी केली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणला.
कुटुंबीयांचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
“डॉक्टर फक्त गप्पा मारण्यात व्यस्त होते आणि माझ्या वडिलांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. डॉक्टरांनी अॅडमिट का केले नाही? उपचारातून डिस्चार्ज का दिला? डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाला” असे आरोप डेव्हिड यांच्या कुटुंबीयांनी केले. तसेच संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे पोस्टमॉर्टम देखील करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणारच नाही असे सांगत डेव्हिडच्या कुटुंबांनी रुग्णालयात गोंधळ घातला. अखेर पोलिस आणि इतर नागरिकाच्या मदतीने हा वाद मिटला असून संबंधित डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संपूर्ण कुटुंब शांत झाले. मात्र, या प्रकरणामुळे रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पूर्वी ही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावल्याच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले. कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.