तू मला कट मारतोस… कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार, त्याने जे केलं पोलिसही पाहात राहिले

शहाड-मोहने रस्त्यावर एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

तू मला कट मारतोस... कल्याणमध्ये माथेफिरू कार चालकाचा थरार, त्याने जे केलं पोलिसही पाहात राहिले
Road-Accident
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 9:10 AM

कल्याणच्या शहाड-मोहने रस्त्यावर रोडरेजची एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. रस्त्यावर गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक वादातून संतापलेल्या स्विफ्ट डिझायर कार चालकाने चक्क दुचाकीस्वाराला जिवे मारण्याच्या उद्देशाने समोरून उडवले. या भीषण धडकेत २५ वर्षीय दीपेश कदम हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला असून सध्या तो कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमधील आयसीयू (ICU) मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

एकीकडे दीपेशची प्रकृती अत्यंत चिंताजनक असताना, दुसरीकडे खडकपाडा पोलीस आरोपीला पाठशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबियांनी केला आहे. “आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाण्यातच जीव देऊ,” असा आक्रमक आणि हृदयद्रावक इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे.

Loading...

३० सप्टेंबरच्या सायंकाळी शहाड-मोहने रोडवरील वर्धमान पार्कसमोर दीपेश कदम आणि एका स्विफ्ट डिझायर कार चालकामध्ये गाडीला कट मारण्यावरून बाचाबाची झाली. दीपेशने स्पीड ब्रेकरजवळ गाडी थांबवून कार चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण माथेफिरू कार चालकाने काहीही न ऐकता थेट दीपेशच्या अंगावर भरधाव कार घातली आणि त्याला हवेत उडवून थेट मोहनेच्या दिशेने पळ काढला.

या अपघातात दीपेशच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. दीपेश हा कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याला ३ वर्षांची एक मुलगी, २ वर्षांची दुसरी मुलगी आणि अवघा ६ महिन्यांचे बाळ आहे. दीपेश हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध असताना, खडकपाडा पोलिसांचे देवरे आणि इतर अधिकारी आरोपीचीच बाजू घेऊन आम्हाला धमकावत असल्याचा आरोप दीपेशच्या आई आणि भावाने केला आहे.

“आम्हाला कोर्टातही जाऊ दिले नाही, पोलिसांच्या या भूमिकेमुळे आम्ही न्यायापासून वंचित राहत आहेत. आम्ही, संपूर्ण कुटुंबासह पोलीस ठाण्यात आत्मदहन करू,” असा संताप दीपेशच्या आईने व्यक्त केला. दरम्यान, या गंभीर आरोपानंतर खडकपाडा पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. रात्रीची वेळ असूनही परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पीडित कुटुंबाचा आक्रोश आणि पोलिसांचा दावा यामुळे या प्रकरण पेटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us