नवी मुंबईच्या ‘नायगाऱ्या’वर पावसाळ्यात प्रवेशबंदी, पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मज्जाव

| Updated on: Jun 22, 2020 | 3:04 PM

खारघर पोलीस आणि सिडको प्रशासनाकडून 17 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडी आणि पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे (Kharghar Police warned people to not go Pandavkada waterfall).

नवी मुंबईच्या नायगाऱ्यावर पावसाळ्यात प्रवेशबंदी, पांडवकडा धबधब्यावर जाण्यास मज्जाव
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईचा नायगारा म्हणून ओळखला जाणारा पांडवकडा धबधबा आणि खारघरची टेकडी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. डोंगर कपारीतून दिडशे ते दोनशे फुटावरुन कोसळणारा पांडवकडा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. मात्र, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खारघर पोलीस आणि सिडको प्रशासनाकडून पावसाळ्यात 17 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडी आणि पांडवकडा येथे पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे (Kharghar Police warned people to not go Pandavkada waterfall).

खारघर टेकडी आणि पांडकडा धबधबा येथे दरवर्षी खारघर, पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईतील तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करते. पावसाळ्यात खारघर परिसराचे विहंगम दृश्य, डोंगर दऱ्यातून झिरपणारे नदी, नाले आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे पावलं खारघर टेकडीकडे आणि पांडकडा धबधब्याकडे वळतात.

खारघर टेकडीवर जाणारा रस्ता वळणदार आहे. त्यात पाण्याचा वाहता प्रवाह आणि पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे खारघर पोलिसांनी आणि सिडको प्रशासनाने 17 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडी आणि पांडवकडा येथे पर्यटकांना प्रवेशबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पांडवकडा धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात गेल्यावर्षी 4 मुली वाहून गेल्या होत्या. खारघर पोलिसांनी 24 तास अथक मेहनत घेत मुलींचा मृतदेह शोधून काढला होता.

“या भागात पावसाळ्यात दरड कोसळते. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेकांचा जीव गेला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटक टेकडीवर जाण्यासाठी सुरक्षा रक्षकासोबत वाद घालत असतात. त्यामुळे खारघर टेकडी आणि पांडवकडा परिसरात कुणी पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, अशी माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.

 

हेही वाचा : कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज, भारतीय सैन्याला शक्तीशाली हत्यारं खरेदी करण्यासाठी 500 कोटी