सोमय्यांच्या निशाण्यावर सरनाईक, विहंग गार्डन प्रकरणी पोलिसात तक्रार

| Updated on: Dec 18, 2020 | 12:57 PM

प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला

सोमय्यांच्या निशाण्यावर सरनाईक, विहंग गार्डन प्रकरणी पोलिसात तक्रार
Kirit Somaiya - Pratap Sarnaik
Follow us on

ठाणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील विहंग गार्डन या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. सोमय्यांच्या आरोपांनंतर सरनाईकांनी 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याआधीच सोमय्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. (Kirit Somaiya files police complaint against Pratap Sarnaik)

ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये एसीपी पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्याशी किरीट सोमय्या यांनी आधी चर्चा केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसात सोमय्यांनी सरनाईकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्यासोबत भाजप आमदार निरंजन डावखरेही यावेळी उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पत्रकार परिषद घेत केला होता. सोमय्यांनी आधी ठाणे महापालिकेकडेही याबाबत तक्रार केली होती.

“चोर मचाये शोर”

प्रताप सरनाईक यांनी सोमय्यांविरोधात शंभर कोटींचा दावा ठोकण्याच्या इशाऱ्याचाही त्यांनी समाचार घेतला. चोर मचाये शोर अशा शब्दात सोमय्या यांनी सरनाईक यांना खोचक टोला लगावला.

किरीट सोमय्या यांचे आरोप काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 16 डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.

सरनाईकांचा दावा काय?

“विहंग गार्डन्स ही इमारत कोणत्याही प्रकारे अनधिकृत नाही. ती इमारत संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन उभारण्यात आली आहे. त्यामुळे माझी बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी कोर्टात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे,” असे  प्रताप सरनाईक म्हणाले होते. तसेच, त्यांनी सोमय्या यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असल्याचे म्हणत, सर्व आरोप फेटाळले आहेत.

 

संबंधित बातम्या :

सोमय्यांचा गंभीर आरोप, सरनाईकांचा शंभर कोटींचा दावा

(Kirit Somaiya files police complaint against Pratap Sarnaik)