Lionel Messi GOAT India Tour : मुंबईकर सज्ज, कोणते रस्ते बंद, कुठे पार्किंगची सुविधा? कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली तर…

लिओनेल मेस्सीच्या मुंबईतील कार्यक्रमामुळे दक्षिण मुंबईत आज (रविवार) वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यावेळी वानखेडे आणि ब्रेबॉर्न परिसरात पार्किंगला बंदी असणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १,००० हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Lionel Messi GOAT India Tour : मुंबईकर सज्ज, कोणते रस्ते बंद, कुठे पार्किंगची सुविधा? कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली तर...
Lionel Messi GOAT India Tour
| Updated on: Dec 14, 2025 | 11:30 AM

प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाच्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आज रविवारी (१४ डिसेंबर २०२५) बहुप्रतिक्षित GOAT इंडिया टूरच्या निमित्त मुंबईत आहे. लिओनेल मेस्सीच्या या कार्यक्रमांमुळे दक्षिण मुंबईत दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडीचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. कोलकातामध्ये झालेल्या गोंधळानंतर मुंबई पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहतुकीसाठी विशेष परिपत्रक जारी

मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासाठी एक विशेष वाहतूक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, दक्षिण मुंबईतील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच वाहतुकीत काही बदलही लागू करण्यात आले आहेत.

मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात आज दिवसभर पार्किंगला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यात डी रोडवर एन.एस. रोडपासून ते ई आणि सी रोड जंक्शनपर्यंत वाहतूक केवळ पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे सोडली जाईल. त्याचप्रमाणे, ई रोडवर वाहतूक केवळ दक्षिणेकडील दिशेने, म्हणजेच डी रोडपासून सी रोड जंक्शनपर्यंत सुरू राहील. याव्यतिरिक्त, वीर नरिमन रोडवर चर्चगेट जंक्शनपासून ई रोडपर्यंतच्या प्रवेशावर मर्यादित निर्बंध असणार आहे. तसेच केवळ अत्यावश्यक वाहने किंवा विशिष्ट प्रवेश असलेले लोकच या रस्त्याचा वापर करू शकतील.

मेस्सीचा कार्यक्रम संपल्यानंतर नेताजी सुभाष रोडवरील एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शनपर्यंत उत्तर दिशेकडे वाहतुकीसाठीचे मार्ग बंद राहतील. तसेच कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना वरळी ताडदेव ते मरीन ड्राईव्ह आणि मरीन ड्राईव्ह ते वरळी ताडदेव यादरम्यानच्या वाहतुकीवर निर्बंध असतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकल ट्रेन आणि मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच, ज्यांच्याकडे कार्यक्रमाची तिकिटे नाहीत, त्यांनी वानखेडे परिसरात गर्दी करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलीस सज्ज

कोलकात्यामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान झालेली परिस्थिती मुंबईत निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. आज दिवसभर जवळपास १५० पोलीस अधिकारी आणि ८०० पोलीस अंमलदार व कर्मचारी मिळून १ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अधिकचा बंदोबस्त म्हणून एसआरपीएफच्या तीन तुकड्या, क्यूआरटी फोर्स आणि इतर विशेष पथकेही बंदोबस्तासाठी सज्ज असतील. त्यासोबतच गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देणे हा पोलिसांच्या तयारीचा मुख्य उद्देश आहे.

दौरा कसा असणार?

मेस्सीचा हा दौरा कोलकाता आणि हैदराबाद येथील यशस्वी कार्यक्रमांनंतरचा तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. यादरम्यान मेस्सी दुपारी सुमारे ४.३० वाजता क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहील. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील यावेळी हजर राहण्याची शक्यता आहे. यानंतर मेस्सी वानखेडे स्टेडियमवर जाईल. याठिकाणी सायंकाळी ५ वाजता बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यासोबतच लिओनेल मेस्सी हा महाराष्ट्र शासनाच्या GOAT फुटबॉल क्लिनिक या उपक्रमातही सहभागी होणार आहे. या माध्यमातून तो अनेक लहान मुलांना फुटबॉलच्या टिप्स आणि मार्गदर्शन देणार आहे.