मुंबईत CNG पुरवठा ठप्प, पंपावर रात्रीपासून लांब रांगा, कुठे काय स्थिती?

महानगर गॅसच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत दुसऱ्या दिवशीही सीएनजी पुरवठा ठप्प आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बस सेवा कोलमडली आहे. सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक, नोकरदार आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईत CNG पुरवठा ठप्प, पंपावर रात्रीपासून लांब रांगा, कुठे काय स्थिती?
CNG Pump Mumbai
Updated on: Nov 18, 2025 | 10:05 AM

महानगर गॅसच्या मुख्य पुरवठा पाईपलाईनला तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील सीएनजी (CNG) पुरवठा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बसची सेवा कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील जवळपास ४० ते ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी सेवा बंद आहेत. ज्यामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच बेस्ट बसमध्येही प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

मुंबईत सीएनजी पुरवठ्यामुळे सध्या परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबई शहरातील बहुतांश पंपांवर CNG बंद असे बोर्ड लावण्यात आले आहेत. ज्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अनेक पेट्रोल पंपावर टेम्पोद्वारे पुरवठा सुरू आहे. मुंबईतील माजगाव येथील सीएनजी पंपावर रात्री १२ वाजल्यापासून खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या तुटवड्यामुळे मुंबईतील ४० ते ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी सेवा कोलमडल्या आहेत. परिणामी नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना कामावर व शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

ठाणे शहरात देखील गॅसकोंडीचा मोठा फटका बसला आहे. ठाण्यातील अनेक ऑनलाईन सीएनजी पंपांवर पहाटेपासूनच रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रिक्षांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा दिसून येत आहेत. अनेक चालकांना सीएनजी भरण्यासाठी एक ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या दिवसाची कमाई पूर्णपणे थांबली आहे.

नवी मुंबईतही सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सीएनजीची तीव्र टंचाई कायम आहे. यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईतील सीएनजी पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या मागणीनुसार पुरवठा नसल्याने प्रवाशांना आजही त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट फटका नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना बसला आहे. रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना कामावर आणि शाळेत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारले जात आहे.

घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम नाही

दरम्यान महानगर गॅस लिमिटेडने घरोघरी होणाऱ्या पीएनजी घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही गंभीर परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र, काही ठिकाणी ‘वडाळा गॅस स्टेशनला होणारा पुरवठाच थांबल्याने’ घरगुती गॅसवरही थोडा परिणाम झाला होता, जो आता सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.