Marathi News Maharashtra Mumbai Maharashtra Budget 2026 27 Mumbai to Navi Mumbai Airport Metro Third City at Atal Setu Bullet Train Updates
Maharashtra Budget 2026 : आता विमानतळांचा प्रवास सुसाट होणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय बदलणार?
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडण्याची आणि अटल सेतू परिसरात 'तिसरी मुंबई' विकसित करण्याची मोठी घोषणा केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणासह संपूर्ण राज्याच्या विकासाचा मायक्रो प्लॅन मांडला. या बजेटमध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, वेगवान वाहतूक आणि तिसरी मुंबई या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबईसह उपनगरे ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा मायक्रो प्लॅन मांडला. यावेळी विशेषतः वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि वेगवान कनेक्टिव्हिटीवर यंदाच्या बजेटमध्ये मोठा भर देण्यात आला आहे. यानुसार मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही महत्त्वाची शहरे आता मेट्रोने जोडली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचे टप्पे
दोन विमानतळ मेट्रोने जोडणार: मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मेट्रोने जोडले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून प्रवास अधिक वेगवान होईल.
तिसरी मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रायगडमधील पेण आणि नवी मुंबई विमानतळ परिसराचा ग्रीन फिल्ड शहर म्हणून विकास केला जाईल.
बुलेट ट्रेन अपडेट: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील पाच स्थानकांचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उन्नत मार्ग आणि कोस्टल रोड: ठाणे ते नवी मुंबई विमानतळादरम्यान उन्नत मार्ग’ (Elevated Road) उभारला जाईल. तसेच, अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडण्यासाठी उलवे किनारी मार्ग प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
समृद्धी महामार्ग विस्तार: दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग येत्या डिसेंबर २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
पनवेल-कर्जत या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.
ऐरोली-कटई नाका: या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून यामुळे ठाणे-नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल.
ग्रामीण रस्ते: राज्यातील १,००० गावांना काँक्रिटच्या रस्त्यांनी जोडण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान या अर्थसंकल्पात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि गडचिरोली-मराठवाडा यांसारख्या भागांच्या औद्योगिक विकासासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.