आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं? भूखंड धोरण ते शेगावच्या विकासापर्यंत मोठे निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले. शासकीय भूखंड वाटप धोरणात सुधारणांना मंजुरी मिळाली, ज्यामुळे छोट्या भूखंडांचा विकास शक्य होईल. तसेच, संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथील यात्रास्थळाच्या विकासासाठी बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं? भूखंड धोरण ते शेगावच्या विकासापर्यंत मोठे निर्णय
cm devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 1:34 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पाडली. या बैठकीत आज तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनात्मक पदावर राहून 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदींचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच शासकीय भूखंडाबाबतचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय संत गजानन महाराज संस्थान यात्रा स्थळाच्या विकासाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनेच याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना मंत्रिमंडळातील निर्णयाची माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुन्हा एकदा अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनात्मक पदावर राहून 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला आहे. अथक राष्ट्र सेवा आणि राष्ट्र सेवेत गरीब आणि वंचितांना समोर ठेवून पंतप्रधानांनी कार्य सुरू केलं आहे. त्याचा उल्लेख या ठरावात केला आहे. त्यांनी प्रधानमंत्री म्हणून नव्हे तर प्रधान सेवक आणि संविधान हाच ग्रंथ मानून काम केलं आहे. त्यांनी कर्मयोग ही भूमिका मांडली त्याचा या ठरावात उल्लेख केला आहे. घर, वीज, पाणी गरीबांनी देण्याचं काम मोदींनी केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Loading...

गुड गव्हर्न्सचं नवीन मॉडल तयार करून अंत्योदयाच्या माध्यमातून विकास होऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं. जीएसटी आणल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळालं. सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर आणि एअर स्ट्राईक केलं. संरक्षण क्षेत्रात त्यांनी आत्मनिर्भरता आणली. राम मंदिराचा विषय, 370 कलम काढण्याचं काम असेल हे सर्व काम गौरवास्पद आहेत. या शिवाजी महाराजांची राजमुद्राही नौदलाच्या झेंड्यावर आणली. शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा म्हणून स्थापित केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ही सर्व कामे मोदींनी केली आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

मोदींमुळे महाराष्ट्र लाभान्वित

एकूणच मोदींच्या पंतप्रधान पदाच्या 12 र्षाच्या काळात महाराष्ट्र लाभन्वित झाला आहे. या काळात महाराष्ट्रात 12 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, अटल सेतू, समृद्धी, बुलेट ट्रेन असेल किंवा वाढवण बंदर, नवी मुंबईचं विमानतळ हे त्यांच्या माध्यमातून झालेलं कार्य आहे. 29 सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्राला सर्वाधिक पैसा मिळाला आहे. मागच्या दुष्काळात बळीराजा संजीवनी योजना केवळ महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील 91 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला आहे. पीएम आवाज योजने अंतर्गत 43 लाख घरे बनत आहेत. इंदूमिलच्या स्मारकासाठी जागा देण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंती निमित्ताने भारतात दोन वर्ष जयंती निमित्त समतेचा विचार पेरण्याचं काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन. घटनात्मक पदावर राहून सलग पंचवीस वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याब‌द्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा ठराव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत केले.

शासकीय मालकीच्या छोट्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या आकाराच्या, उपयुक्त आकार नसलेल्या, पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३७ व ३७ अ मधील तरतुदीत सुधारणा करण्यात येणार आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांना मौजे गिरडा ( ता. व जि. बुलढाणा) येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संस्थानाला यापुर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर. जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर बांधकाम करता येणार. यामुळे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us