
सध्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल सातत्याने चर्चा होताना दिसत आहे. पण या चर्चांमधून काँग्रेसने मात्र फारकत घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मनसेसोबत युती किंवा आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसने मनसे आणि एमआयएम (AIMIM) या दोन्ही पक्षांसोबत कोणत्याही प्रकारची आघाडी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतीच काँग्रेसची दोन दिवसीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत जाण्याचा एकही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी, मनसेची परप्रांतीय विरोधी आणि अल्पसंख्याक विरोधी भूमिका ही पक्षाच्या धर्मनिरपेक्ष धोरणांशी विसंगत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करणे शक्य नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आणि एमआयएमसोबत कोणतीही आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेबद्दलच्या भूमिकेवर वारंवार पक्षाचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत. पण मनसे सोबत नाही. राज ठाकरे यांच्या मनसेला महाविकास आघाडी सामील करून घेण्याचा किंवा त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही. मनसेसारख्या पक्षांसोबतच्या धोरणात्मक युतीबद्दलचा अंतिम निर्णय काँग्रेसची राष्ट्रीय हायकमांड घेईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस हे आम्ही वेगळे केले आहे. स्थानिक पातळीवर स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या संमतीने जे काही निर्णय घेतील, त्या पद्धतीचे निर्णय होत आहेत. स्थानिक आघाडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद आहेत का, या प्रश्नावर नाना पटोले यांनी भाष्य केले. हे काही काँग्रेसमध्येच होत आहे असं नाही. भाजपमध्ये सुद्धा आपण पाहत आहोत की, संपूर्ण महाराष्ट्रमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असेल… हे एकमेकांच्या विरोधात भांडत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसने मनसेसोबत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.