Covid Vaccination: महाराष्ट्राचा आणखी एक विक्रम; एकाच दिवसात 14.39 लाख नागरिकांना टोचली लस

Covid vaccination | महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाख २० हजार ५६० लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख ७८ हजार ८०५ जणांना दुसऱ्या लसीची मात्रा देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

Covid Vaccination: महाराष्ट्राचा आणखी एक विक्रम; एकाच दिवसात 14.39 लाख नागरिकांना टोचली लस
लसीकरण कमी झाल्यास गावचे सरपंच पद धोक्यात
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 12:00 PM

मुंबई: संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेऊन लसीकरणाचे नवे विक्रम करत आहे. २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६५, तर ४ सप्टेंबर रोजी १२ लाख २७ हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले त्यानंतर १२ लाख लसीकरणाचा विक्रम मोडून काढत आज रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १४ लाख ३९ हजार ८०९ लसींची मात्रा एका दिवसात देण्याची किमया आरोग्य विभागाच्या यंत्रणेने करून दाखवली आहे. लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसीची दुसरी मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी ५५ लाख २० हजार ५६० लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख ७८ हजार ८०५ जणांना दुसऱ्या लसीची मात्रा देऊन त्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

दरम्यान, लसीकरण मोहिमेला राज्यात गती देण्यासाठी आरोग्य यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषदेमध्ये तज्ज्ञांनी देखील लसीकरणावर विशेष भर देण्याची गरज अधोरेखित केली असून त्यापूर्वीपासूनच राज्य शासनाने लसीकरणाला गती दिली आहे.

लसीकरणावर एक दृष्टिक्षेप –

● १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ४८.४६%

● १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ३७.८८%

● ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लोकांचे प्रमाण : ५२.२४%

दैनंदिन लसीकरण

● २१ ऑगस्ट – ११,०४,४६५

● ३० ऑगस्ट – १०,३५,४१३

● १ सप्टेंबर – ९,७९,५४०

● ४ सप्टेंबर – १२,२७,२२४

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Corona Cases In India | नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दोन दिवसात 12 हजारांनी वाढ, सक्रिय रुग्णही वाढले

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी; बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस तैनात