‘औरंग्याच्या अवलादींना सोडणार नाही, कायदा हातात घेऊ नका’, गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन

| Updated on: Jun 07, 2023 | 3:02 PM

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे. औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांना सरकार अजिबात सोडणार नाही. पण आपण कायदा हातात घेऊ नका. कारण ते चुकीचं आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

औरंग्याच्या अवलादींना सोडणार नाही, कायदा हातात घेऊ नका, गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कोल्हापुरात आज हिंदू संघटनांचा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रचंड मोठी गर्दी होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. पोलिसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन दिलं. यावेळी खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. जमावबंदी असल्याने गर्दी जमलेली होती. त्यामुळे अखेर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिस्थितीत चिघळली. काही आंदोलकांकडून दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या सगळ्या घडामोडींवर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

“अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावा लागेल. याच्या पाठीमागे कोण आहे याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत, याकरता या अवलादी पैदा झाल्या नाहीत ना? हे देखील आपल्याला तपासून पाहावं लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘कायदा कुणीही हातात घेऊ नये’

“कोल्हापुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणीही कायदा-सुव्यवस्था खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. कायदा कुणीही हातात घेऊ नये”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

‘औरंग्याच्या अवलादींना सोडणार नाही’

“आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशाप्रकारच्या औरंग्याच्या अवलादींना सोडणार नाहीत. या राज्यात कुणीही औरंग्याचं उदात्तीकरण करु शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत याचे बोलवते धनी कोण आहेत, हेही शोधून काढावं लागेल. ते आम्ही शोधून काढून”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

“महाराष्ट्रासारख्या राज्यात कायदा हातात घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतोच. यासोबत महाराष्ट्राचं नावलौकिक आहे, एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे त्यावर डाग लागतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की, कायदा हाती घेऊ नका. कारण कुणी कायदा हातात घेतला तर कारवाई करावीच लागेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले ते मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात औरंगजेबाचं कुणी उदात्तीकरण केलं तर साहजिक संताप होतोच. फक्त संतापात कायदा हातात घेणं योग्य नाही. त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.