
राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार अमित शाहांकडे केल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील एक कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला. मी कार्यक्रमाची साईज बघत नाही. कामाची साईज बघतो. आयुष्यात चांगलं शिक्षण आणि शिक्षक मिळाले नाहीत तर काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… असे जे काही दिवटे निघाले त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर त्यांच्या नाड्या आवळल्या जातात हे आपण वाचतो. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. आजच तुम्ही पेपरमध्ये वाचलं असे तर त्यात लिहिलं आहे. बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेले होतं. ही लाचारी का आणि कशामुळे. जर त्यांना त्या वयात योग्य शिक्षण मिळालं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली. गेले ३-४ वर्ष महापालिकेत बाप कोण आहे तेच कळत नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत. सामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन आमदारांना केले.