
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती, तो मुहूर्त अखेर आज उजाडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी १२ वाजता होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा आज २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे होणार आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता दोन्ही ठाकरे बंधू शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. हे केवळ राजकारण नसून महाराष्ट्राच्या हितासाठी झालेला प्रीतिसंगम आहे,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या युतीचे स्वागत केले आहे.
युतीची घोषणा करण्यासाठी वरळी सी फेस येथील हॉटेल ब्ल्यु सी या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. आज त्याच जागी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही रणनीती आखली आहे. आज केवळ युतीची घोषणा होणार असून जागावाटपाचा सविस्तर आराखडा नंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसह ठिकठिकाणी ठाकरे बंधूंची युती होणार आहे.
या ऐतिहासिक युतीमुळे राज्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलणार आहे. विशेषतः मुंबई आणि ठाणे पट्ट्यात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सत्ताधारी पक्षांनी या युतीवर नौटंकी अशी टीका केली असली, तरी ठाकरे बंधूंनी मात्र शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. या प्रीतिसंगमामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँडची ही जादू किती चालणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.