आला डरकाळी फोडत…. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी तारीख वेळ सांगितली
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता, अखेर तो दिवस आता सत्यात उतरताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख अखेर ठरली आहे. खासदार संजय राऊत यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असून राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना संजय राऊत यांनी उद्या १२ वाजता इतकंच म्हटलं आहे. पण त्यांच्या या ट्वीटनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्वीस्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्या १२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
जागावाटपाचा फॉर्म्युला काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मराठी मतांचे समीकरण जुळवण्यासाठी हा नवा प्रयोग केला जात आहे. मुंबईतील दादर, माहीम, शिवडी आणि परळ सारख्या विभागांत दोन्ही पक्षांना समसमान प्राधान्य दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक चर्चेनुसार, शिवसेना (UBT) साधारणपणे १४०-१५० जागा लढवेल, तर मनसेच्या वाट्याला ६०-७० जागा येऊ शकतात. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक
दरम्यान मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार मंगळवारी २४ डिसेंबरपासून अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. इच्छुक उमेदवारांना आपले नामांकन अर्ज ३० डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करता येतील, ज्याची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. त्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. यानंतर अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २८६९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
