BMC Election 2026 : महायुतीत 77 जागांवरुन रस्सीखेच, मध्यरात्री वर्षावर खलबतं; कोणाचं तिकीट कापलं जाणार?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 150 जागांवर एकमत झाले असून, उर्वरित 77 जागांसाठी 'वर्षा' आणि 'नंदनवन'वर खलबते सुरू आहेत. नातेवाईकांना तिकीट देण्यावरून नेत्यांमध्ये नाराजी असून, आज राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी १५० जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित ७७ जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे.
७७ वादग्रस्त जागांवर सविस्तर चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महायुतीच्या बैठकीपूर्वी भाजप नेत्यांसोबत मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र आढावा घेतला होता. त्यानंतर झालेल्या संयुक्त बैठकीत ७७ वादग्रस्त जागांवर सविस्तर चर्चा झाली. यातील ३० ते ३५ जागांचा तिढा रात्रीच सुटला आहे. उर्वरित जागांवर उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत आमदारांच्या नातेवाईकांचा तिकिटासाठीचा आग्रह सर्वात कळीचा मुद्दा ठरला. मुंबईतील वडाळा, प्रभादेवी, चेंबूर, बोरीवली आणि अंधेरी यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांच्या नातेवाईकांनी तिकिटासाठी चढाओढ लावली आहे. यावरून शिवसेना आणि भाजपच्या कोअर कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ नातेवाईकांनाच महत्त्व दिले तर सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे सर्वसामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्या, असा पवित्रा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी घेतला आहे.
मराठी मतदार भाजपला मतदान करणार नाही
शिवसेनेने मुंबईतील आपल्या पारंपारिक मराठी पट्ट्यावर अधिक जोर दिला आहे. दादर, परळ आणि लालबाग या भागात शिवसेनेला जास्त जागा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी लावून धरली आहे. या भागातील पारंपारिक मराठी मतदार भाजपला मतदान करणार नाही, तिथे शिवसेनेचाच वरचष्मा राहील, असा युक्तिवाद शिवसेना नेत्यांनी केला.
वर्षावरील खलबतांनंतर आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यात मुंबईतील जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून मुंबई महापालिका स्वबळावर लढणार की युतीमध्ये, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी ४ वाजता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. सर्व जागांचा तिढा सुटल्यानंतर उद्या दुपारपर्यंत मुंबई महापालिकेच्या संपूर्ण जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
