पटेल, तटकरेंच्या पदांचं काय? राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय नाहीच, वादावर सुनेत्रा पवार यांचं सूचक मौन

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत अंतर्गत वाद वाढले आहेत. पार्थ पवारांचा हस्तक्षेप आणि विधानपरिषद निवडणुकीतील अपयशामुळे नाराजी आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी वादावर मौन बाळगले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या पदांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने पक्षातील संभ्रम कायम आहे.

पटेल, तटकरेंच्या पदांचं काय? राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय नाहीच, वादावर सुनेत्रा पवार यांचं सूचक मौन
sunetra pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 1:57 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. हे वाद काही संपता संपत नाहीये. पार्थ पवार यांचा पक्षातील वाढलेला हस्तक्षेप आणि विधान परिषद निवडणुकीत पक्षाला आलेलं अपयश यामुळे पक्षातील नाराजी अधिकच वाढली आहे. त्यातच पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन थेट पार्थ पवार यांचीच तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पक्षातील या वादावर आजच्या बैठकीत पडसाद उमटतील असं बोललं जात होतं. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या वादावर सूचक मौन पाळल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आता पक्षातील खदखद संपणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांबाबतही कोणताच निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज सकाळी 9.30 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि समीर भुजबळ उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते. यावेळी पक्षातील अंतर्गत वादावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मौन बाळगल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या मनात काय चाललंय? अशी चर्चा आता रंगली आहे.

Loading...

कोअर कमिटीला विचारूनच निर्णय

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी नुकत्याच पक्षातील काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्या कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून झिशान सिद्धकी आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हेच कायम राहणार आहेत. या दोघांचं पुढील 6 महिन्यातील काम पाहून निर्णय घेऊ, अशी पार्थ पवारांनी या बैठकीत भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आगामी काळात कोअर कमिटीला विचारात घेऊनच निर्णय घेतले जातील, असा पुनरुच्चार पार्थ पवार यांनी केल्याचं सांगितलं जात आहे.

दोन पदांबाबत संभ्रम कायम

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पदावर चर्चा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या पदांबाबत अजूनही संभ्रम कायम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us