Maharashtra Oxygen Express : प्राणवायू घेऊन ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ महाराष्ट्राकडे रवाना, राज्याला नवसंजीवनी!

| Updated on: Apr 23, 2021 | 7:01 AM

महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

Maharashtra Oxygen Express : प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना, राज्याला नवसंजीवनी!
ऑक्सिजन एक्सप्रेेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास 100 टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस उद्या महाराष्ट्रात दाखल होऊ शकते. (Oxygen Express leaves Vizag for Maharashtra with 7 tankers of liquid oxygen)

‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. रेल्वेने देशातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी आवश्यक वस्तूंची वाहतूक करणं आणि नावीन्यपूर्ण कामे करुन कठीण काळात देशाची सेवा केली आहे’, असं ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलंय.

राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमधून ऑक्सिजन

राष्ट्रीय स्टील निगम लिमिटेड विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये ही एक्सप्रेस गुरुवारी सकाळी दाखल झाली. त्यानंतर या एक्सप्रेसवरील 7 रिकाम्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ही एक्सप्रेस विझागवरुन रवाना झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत ही स्पेशल रेल्वे नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक टँकरमध्ये 15 ते 20 टन लिक्विड ऑक्सिजन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राला जवळपास 100 टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. सकाळी ही ट्रेन विशाखापट्टणम इथं दाखल झाल्यानंतर सर्व टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरणे, वजन करणे आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी 20 तासांचा अवधी लागू शकतो असं सांगण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Oxygen Express : देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

Oxygen Express | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’; देशभरातून राज्यात रेल्वेने ऑक्सिजनचा पुरवठा

Oxygen Express leaves Vizag for Maharashtra with 7 tankers of liquid oxygen