धक्कादायक… SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राज्याच्या प्रारुप मतदार यादीतून महाराष्ट्रातील २ कोटींहून अधिक, तर मुंबईतील ३६ लाख मतदारांची नावे वगळल्याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे. हा आकडा धक्कादायक असून, विशिष्ट धर्माचे किंवा विरोधी मतांचे मतदार वगळले जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे.

धक्कादायक... SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
SIR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 01, 2026 | 10:48 AM

राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं महाराष्ट्राची एसआयआर-2026 प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतून महाराष्ट्रातून 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. ही माहिती ताजी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी नावे वगळली गेली आहेच. पण मुंबईतील 36 लाख मतदारांची नावे या यादीतून कापली गेली आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार आणि मुंबईतील 36 लाख मतदार वगळले आहेत. ही चिंतेची बाब आहे. पश्चिम बंगालमध्ये हेच केलं. पश्चिम बंगालमध्ये 85 लाख मतदार वगळले होते. टीएमसीला मतदान करणारे मतदार वगळले होते. महाराष्ट्रात असे कार्यक्रम झाले आहेत. आमचं त्यावर संशोधन सुरू आहे. मुंबईतील 36 लाख मतदार वगळले, हा आकडा साधा नाही. एका विशिष्ट धर्माचे, समाजाचे किंवा विरोधात मतदान करणारे लोक वगळण्यात आले आहेत. भाजपच्या कार्यालयात एसआरएचे फॉर्म सापडले आहेत. त्यावरही आमचे काम सुरू आहे. आमची यंत्रणा कामाला लागली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

जीडीपी वाढला तर बेरोजगारी, महागाई का?

केंद्र सरकारने जीडीपी वाढल्याचा दावा केला आहे. त्यावरही राऊत यांनी जोरदार टीका केली. मोदी खोटं बोलत आहेत. खोटे आकडे लावण्यात भाजपवाले पटाईत आहेत. त्यावर राजकारण करत आहे. जर जीडीपी वाढलाय तर देशाची परिस्थिती अशी का आहे? बेरोजगारी का वाढली? महागाई का वाढली? लोकांना नोकऱ्या का मिळत नाही? त्याचे उत्तर द्या. जीडीपी कुणाला कळतो? अमित शाह आणि पंतप्रधानांना तर जीडीपी काय माहीत आहे का? लोकांना रोजीरोटी हवी आहे. जीडीपी वाढला आहे तर 85 कोटी लोकांना 10 किलो धान्य देऊन का जगवत आहात? म्हणजे 85 टक्के लोक उपाशी आहेत, असा सवाल राऊत यांनी केला.

तुम्ही खरोखरच कारसेवेला गेला होता ना?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिराच्या लुटीवर भाष्य केलं होतं. त्यावरूनही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं. मुख्यमंत्री एक नंबरचे खोटारडे आहेत. राम मंदिर लुटीची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली होती. त्याचा रिपोर्ट वाचायाला फडणवीस यांना द्या. एसआयटी स्थापन झाली. लोकांना अटक केली. पुरावे गोळा केले. मंदिराचे लुटलेले पैसे जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही? चांगला डोळ्याचा डॉक्टर असेल तर त्यांना दाखवा. राम मंदिराचे शेकडो कोटी रुपये लुटलेले आहे. गृहमंत्रीपद सांभाळणारा व्यक्ती त्याचं समर्थन करतो, कठिण आहे तुमचं. तुम्ही खरोखरच कारसेवेला गेला होता ना? शंका यायला लागली आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Follow Us