
मुंबई | 31 ऑगस्ट 203 : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुबंईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचे कायदे जिथे बनतात, सर्वसामान्यांसाठी जिथे न्यायाचे निर्णय घेतले जातात, अशा मंत्रालयाच्या बाहेरच्या परिसरात आज एक अनपेक्षित घटना घडली आहे. मंत्रालयाच्या बाहेर मेट्रोचं काम सुरु आहे. या मेट्रो कामाचा एक भाग म्हणून सुरुंग लावण्यात आला होता. खरंतर हा छोटा ब्लास्ट होता. पण या ब्लास्टमुळे मंत्रालयाबाहेर असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मंत्रालयाजवळ असणाऱ्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत. त्यामुळे हा स्फोट घडवण्याआधी सुरक्षेची योग्य काळजी घेतली गेली नव्हती का? असा प्रश्न निर्माण झालाय.
मंत्रालयाच्या समोर मेट्रोचं काम सुरु आहे. मेट्रोच्या कामानिमित्त छोटे-छोटे सुरुंग लावले जातात. पण त्याचाच फटका मंत्रालय परिसरात बसला आहे. मंत्रालय परिसरात असलेल्या इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. स्फोट झाल्यानंतर काही दगड उडून आले. त्यामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच वाहनांचंदेखील नुकसान झालंय. या स्फोटानंतर काही दगड हे मंत्रालय परिसरातही आदळले. हे दगड कुणा नागरिकाला लागले असते तर त्यांना दुखापत झाली असती. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. पण गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.
मंत्रालय परिसरात मोठमोठ्या मंत्र्यांच्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या असतात. अतिशय सुरक्षेचा हा परिसर आहे. मंत्र्यांची सुरक्षा फार महत्त्वाची मानली जाते. असं असताना या अशाप्रकारच्या स्फोट घडवून आणताना सुरक्षेची काळजी घेणं जास्त अपेक्षित असतं. त्यामुळे यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलंय का? याची चौकशी होणं जास्त गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अशाप्रकारचे सुरुंग लावले जात आहेत.
मंत्रालयाच्या जुन्या इमारतीला या स्फोटाचा फटका बसला आहे. स्फोटानंतर दगड आदळल्याने इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. विशेष म्हणजे मंत्रालयसारख्या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील परिसरात अशाप्रकारची घटना घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे.