नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये मोठा घोटाळा; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन पैसे लाटल्याचा प्रकार उघड

| Updated on: Nov 26, 2020 | 7:05 PM

याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. | Navi Mumbai Covid testing centre

नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये मोठा घोटाळा; 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन पैसे लाटल्याचा प्रकार उघड
Follow us on

नवी मुंबई: राज्यातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक परिस्थितीची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत समोर आली आहेत. यामध्ये आता कोविड टेस्टिंगमधील घोटाळ्याची भर पडली आहे. नवी मुंबईच्या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये (Covid Testing Centre) हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी 10 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल देऊन शासनाकडून पैसे लाटण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे. (Major sacm in Navi Mumbai Covid centre)

ही बाब समोर आल्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बुधवारी याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक , भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हेदेखील उपस्थित होते.

पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आत्तापर्यंत कोव्हिड सेंटर प्रकरणी 150 ते 200 पत्रं दिली काहीच कारवाई झाली नाही. आरोग्यमंत्री हतबल झाले आहेत त्यांना परिस्थिती सांभाळणं अवघड जात आहे. मृत लोकांचे अहवाल दाखवतात, काही लोकं गावाला आहेत त्यांची माहिती घेऊन पररस्पर खोटे अहवाल तयार करून पैसे लाटणे सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली.

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी मुंबईत कोल्ड स्टोरेजची तयारी

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजसाठी मुंबईत तयारी सुरु करण्यात आली आहे. कांजुर-भांडुप भागात एक जागा जवळजवळ निश्चित मानण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली.

मुंबईत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथील तीन जागांचा लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी विचार सुरु आहे. मात्र पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा निश्चित होत आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सीरमचे अदर पुनावाला यांनी सांगितले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक; गृहमंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

थंडीत घसरता पारा, वाढते प्रदूषण, ‘AIIMS’ संचालकांना कोरोना संसर्ग वाढण्याची धास्ती

(Major sacm in Navi Mumbai Covid centre)