Medha Somaiya : ‘समाजामध्ये अशी…’, संजय राऊतांच्या शिक्षेवर मेधा सोमय्या काय म्हणाल्या?

Medha Somaiya : "आजची जजमेंट स्वागतार्ह आहे. जस्टिस कॅन बी डिले, बट नॉट डिनाय, हे आजच्या निकालातून दिसलं. मी सेल्युट करतो. प्रत्येकजण कायद्यासमोर समान आहे, हे सिद्ध झालं"

Medha Somaiya : समाजामध्ये अशी..., संजय राऊतांच्या शिक्षेवर मेधा सोमय्या काय म्हणाल्या?
Medha kirit Somaiya on sanjay raut convict in defamation case
| Updated on: Sep 26, 2024 | 1:41 PM

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज माझगाव सत्र न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर त्यांनी टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केला होते. या प्रकरणी मेधा सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मेधा सोमय्या यांची युवा प्रतिष्ठान संस्था आहे. या संस्थेला मीरा-भाईंदर पालिकेकडून 16 शौचालय बांधण्याच कंत्राट मिळालं. त्यात त्यांनी घोटाळा केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांवरुन मेधा सोमय्या यांनी कोर्टात संजय राऊत यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता.

आज निकाल लागल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला मेधा सोमय्या आणि या खटल्यात कोर्टात युक्तीवाद करणारे वकील उपस्थित होते. “आजची जजमेंट स्वागतार्ह आहे. जस्टिस कॅन बी डिले, बट नॉट डिनाय, हे आजच्या निकालातून दिसलं. मी सेल्युट करतो. प्रत्येकजण कायद्यासमोर समान आहे, हे सिद्ध झालं. तुम्ही पदावर आहात म्हणून कुठल्याही न्यायालयीन सेक्शनच, तरतुदीच उल्लघंन करता येणार नाही हे स्पष्ट झालं. आम्ही कोर्टाचे आभार मानतो. जो निकाल आला, त्याला सलाम. आजची जजमेंट म्हणून कोण कोणावरही कसेही आरोप करु शकत नाही” असं सोमय्या यांचे वकील कनक आणि विवेकानंद गुप्ता म्हणाले.

मेधा सोमय्या काय म्हणाल्या?

“न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली. न्याय व्यवस्थेवरील माझा विश्वास आणखी दृढ झाला आहे. रामशास्त्री प्रभुणे यांची परंपरा पाळली जाते, हे पाहून बरं वाटलं. समाजामध्ये अशी बेताल वक्तव्य करणार असाल, तर एक शिक्षिका, समाजसेविका म्हणून मी हे सहन करणार नाही. माझ्या संस्थेला कोणी डाग लावण्याचा प्रयत्न केला, तर मी सामोरी जाईन. माझ्यासोबत काम करणाऱ्यांचा मला अभिमान वाटतो. समाज, मित्र मंडळी यांचा पाठिंबा असल्याने मी धैर्याने उभी राहू शकले. मीडियाचेही मी आभार मानते” असं मेधा सोमय्या म्हणाल्या.