शरद पवार आणि एसीबीचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यात बैठक

| Updated on: Jan 11, 2020 | 1:16 PM

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री होते. त्यावेळी त्यांनी हजारो कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप आहे. नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल आहे. ही पार्श्वभूमी असताना, थेट शरद पवार आणि एसीबीचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यात बैठक होत असल्याने, याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत.

शरद पवार आणि एसीबीचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यात बैठक
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांची बैठक झाली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री होते. त्यावेळी त्यांनी हजारो कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप आहे. नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल आहे. ही पार्श्वभूमी असताना, थेट शरद पवार आणि एसीबीचे महासंचालक परमबीर सिंह यांच्यात बैठक होत असल्याने, याबाबत अनेक तर्क लढवले जात आहेत.

एसीबीचे प्रमुख असलेल्या परमबीर सिंह यांनी याआधी अजित पवार यांना क्लीन चीट दिली होती. मात्र, दोनच दिवसात त्यांनी घूमजाव करून आपल्याकडून नजरचुकीने ते झाल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. त्याबाबत त्यांनी कोर्टाची माफी मागितली होती.

सिंचन घोटाळा : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, ‘जनमंच’ची मागणी

दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या कार्यालयाशेजारच्या हॉलमध्ये जलसंधारण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील हे बैठकीला मार्गदर्शन करत आहेत. या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यातच आता त्याठिकाणी एसीबीचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग हे पोहचल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

जनमंच संघटनेचा एसीबीवर आरोप

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, अशी विनंती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे जनमंच संघटनेने केली आहे. एसीबीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सिंचन घोटाळा प्रकरणी याचिका दाखल केलेल्या जनमंचकडून करण्यात आला आहे.