
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर काही तासांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. काही गाड्या उशिराने धावणार आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी मुंबई लोकलच्या कोणत्या मार्गावर किती वाजता ब्लॉक असणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील 5 व्या आणि 6 व्या मार्गिकांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस या गाड्या विद्याविहार स्थानकावर डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या 10 ते पंधरा मिनिटे उशिरा धावणार आहेत.
त्याचबरोबर सीएसएमटीकडे जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्याही 10 ते 15 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4 :10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यानच्या अप व डाउन ट्रान्स-हार्बर सेवा बंद राहणार आहेत. तसेच ठाण्यातून वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा 10:35 ते 4:07 आणि पनवेल/नेरूळ/वाशी कडून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा 10:25 ते 4:09 पर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहण्याचा आणि गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.