
मुंबईत पाणी साचणार नाही? हा दावा पुन्हा फोल ठरला. मुंबईतील नालेसफाईची निकृष्ट कामे रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने उघड केली. एका रात्रीत पडलेल्या पावसामुळे मुंबईची ‘तुंबई’ झाली. मुंबईतील सखल भागात पाणी साचले. मध्य रेल्वेची लोकल आणि एक्स्प्रेस सेवा विस्तळीत झाली. आता सोमवारी दिवसभर मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), सोमवार, 8 जुलै रोजी दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. दुपारच्या सत्राचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. मध्यरात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. पुण्याकडे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती आहे. भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे कर्मचारी कडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही सिग्नल न मिळालाने एकामागे एक लोकल गाड्या उभ्या आहेत.
mumbai rain
मुंबईत 8 जुलै ते 13 जुलै या कालावधीत ढगाळ वातावरण राहणार आहे. 8 जुलै रोजी मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 9 जुलै रोजी हलक्या पावसासह तापमान 25 अंश सेल्सिअस ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. 10 जुलै रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. 11 जुलै मध्यम तर 12 आणि 13 जुलैला पावसाचा अंदाज कायम आहे.
सकाळी आठच्या सुमारास कल्याण ते सीएसटी पहिली लोकल रवाना झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला तर मध्य रेल्वेची लोकसेवा सुरळीत होईल. मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार झालेल्या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफलाइनला देखील बसला आहे. मुंबईतील हर्बल लाईनची सेवा ठप्प झाली आहे. सकाळी ६ ची ट्रेन ७ वाजता चेंबूर रेल्वेस्थानकावर पोहचली आहे. पण चेंबूर रेल्वेस्थानकाच्या पुढे रेल्वेरुळावर पाणी साचल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नाही आहेत.