अघोरी विद्येच्या मागे लागणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो; संजय राऊत यांचा निशाणा कुणाला उद्देशून?

| Updated on: Nov 25, 2022 | 2:09 PM

पक्षांतर या आधीही झालेले आहेत. यापुढेही होतील. पण हे पक्षांतर नसून यांनी रक्तच बदललं आहे. त्यांनी डीएनएच बदलला आहे. रक्तांतर केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

अघोरी विद्येच्या मागे लागणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो; संजय राऊत यांचा निशाणा कुणाला उद्देशून?
अघोरी विद्येच्या मागे लागणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो; संजय राऊत यांचा निशाणा कुणाला उद्देशून?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. अघोरी विद्येचे लोक अघोरी विद्येवर अधिक विश्वास ठेवतात. अघोरी विद्येच्या मागे पळणाऱ्यांचा अंतही अघोरीच होतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

ज्यांचं आत्मबल आणि आत्मविश्वास कमी असतो. ते अशा प्रकारच्या जंतरमंतर आणि मंत्रतंत्रात जातात. ज्योतिष विद्येच्या मागे लागतात. लागू द्या. महाराष्ट्रातील जनतेने त्यांचं भविष्य ठरवलं आहे. त्यांचं भविष्य काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच ते कुंडली दाखवत आहेत. त्यांच्या कुंडलीत काही महिन्यात सत्ता योग नाहीये. त्यांची कुंडली स्पष्ट सांगत आहे. माझाही कुंडलीचा अभ्यास आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

त्यांना गुवाहाटीला जाऊ द्या नाही तर लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्या. राज्यातील जनतेच्या हृदयातून त्यांचं स्थान नष्ट झालं आहे. ते इथे गेले काय आणि तिथे गेले काय, जमिनीखाली गेले काय आणि आकाशात गेले काय काय फरक पडतो? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

हे 40-50 लोकं आहेत. त्यांचं नामोनिशाण राज्यातील जनतेने आपल्या हृदयातून पुसून टाकलं आहे. असे घाणेरडे लोकं या महाराष्ट्रातील राजकारणात कधी झाले नव्हते. पक्षांतर या आधीही झालेले आहेत. यापुढेही होतील. पण हे पक्षांतर नसून यांनी रक्तच बदललं आहे. त्यांनी डीएनएच बदलला आहे. रक्तांतर केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

सीमावादाच्या प्रश्नावरूनही त्यांनी शिंदे सरकारला घेरलं. हे खोके सरकार आहे. प्रत्येकवेळी खोक्याची बात करतात. त्यांना दिल्लीतून पैसे आले तर महाराष्ट्रातील जमीन सोडतील. त्यांना राज्याशी काही घेणं देणं नाही. राज्यावर त्यांचं प्रेम नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

सर्वांनी एकत्र यावं, पाणी दाखवावं ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत. याच विषयावर माझं शरद पवार यांच्याशी बोलणं झालंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.