VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

| Updated on: Nov 20, 2021 | 6:05 PM

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं... बिरोबाच्या नावानं चांगभलं... खंडोबाच्या नावानं चांगभलं... अशी घोषणाबाजी करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान दणाणून सोडलं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे.

VIDEO: बिरोबाच्या नावानं चांगभलं... आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई: ज्योतिबाच्या नावानं चांगभलं… बिरोबाच्या नावानं चांगभलं… खंडोबाच्या नावानं चांगभलं… अशी घोषणाबाजी करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान दणाणून सोडलं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे. त्यामुळे आम्ही परिहन मंत्री अनिल परब यांना साडी चोळी देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत परब यांच्या बंगल्यावर आम्ही धडक देणारच… असा निर्धार व्यक्त करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. हजारोच्या संख्येने एसटी कामगार एकवटल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे म्हणून एसटी कामगारा गेल्या 12 दिवसांपासून संप करत आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हजारो एसटी कामगार आझाद मैदानात येऊन थांबले आहेत. दुसरीकडे राज्य सरकारसोबतच्या चर्चेतून संपाचा तोडगा निघताना दिसत नाही. त्यामुळे अनिल परब यांना साडी चोळी देणार असल्याचं एसटी कामगारांनी जाहीर केलं होतं. एसटी कामगार अनिल परब यांच्या बंगल्यावर धडकणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्याही आझाद मैदानात आले होते. त्यातच आझाद मैदानात अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी बॅरिकेटींग करून तटबंदी उभी करून आंदोलकांना मैदानाबाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले होते.

जोरदार घोषणाबाजी

त्यानंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी हातात माईक देऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. ज्योतिाबाच्या नावानं चांगभलं… भैरोबाच्या नावनं चांगभलं… म्हसोबाच्या नावानं चांगलं भलं… अशा घोषणा पडळकर यांनी देताच आंदोलकांनीही जोरदार घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या. यावेळी महिला आंदोलकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

सरकारने अंत पाहू नये

सरकार पहिल्या दिवसांपासून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपत आहे. आम्ही परिवहन मंत्र्याला साडीचोळी द्यायला निघालो होतो. शेकडो पोलीस जमले. आम्हाला जाऊ देत नाही. आम्ही कायदा मानणारे आहोत. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. पण आम्हाला मैदानाच्या बाहेर पडू दिलं जात नाही. आम्ही सरकारचा निषेध नोंदवतो, असं त्यांनी सांगितलं. आम्हाला कितीही अडवले तरी कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर पोहोचणारच. आमचे प्रश्न सोडवा. आमचा अंत बघू नये. सरकारने निर्णय घ्यावा. उद्या जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला.

ही मोगल सेना आहे का?

भावाला बहिणी भाऊबीजेचा आहेर घेऊन चालल्या आहेत. आता तरी तुम्हाला आमची दया येते का? असा या बहिणींचा सवाल आहे. पण हे सरकार पोलिसांकरवी हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे.
एसटी कामगारांना रोखलं आहे. बळाच्या जोरावर आंदोलन चिरडू नका. शिवसैनिक एसटी कामगारांना मारत आहेत. ही शिवसेना आहे की मोगल सेना आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राज्यात माफियागिरी सुरू

यावेळी किरीट सोमय्या यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. या राज्यात सरकार आहे की नाही? सरकार इथे येत नाही आणि कामगार भगिनी भेटायला येत आहे तर त्यांना भेटू देत नाही. या सरकराने संवेदनहिनतेची हद्द गाठली आहे. राज्यात नुसती माफियागिरी सुरू आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली.

संबंधित बातम्या:

ST Employee Strike | आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आंदोलकांनी बाहेर पडू नये यासाठी तटबंदी

बळीराजाच्या रेट्यापुढे हुकूमशाही वृत्तीचे मोदी सरकार झुकले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

विदर्भातील कोरोनाचे रुग्ण कमी, 11 जिल्ह्यात सापडले 10 रुग्ण, बरे होण्याचं प्रमाण जास्त