मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता स्वस्त दरात मिळणार स्वतःचं हक्काचं घर; कुठे, कधी, सरकारचा प्लॅन काय?

मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींना लगाम लागणार आहे. त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता स्वस्त दरात मिळणार स्वतःचं हक्काचं घर; कुठे, कधी, सरकारचा प्लॅन काय?
mumbai home
| Updated on: Apr 13, 2026 | 8:50 AM

मुंबईला स्वप्ननगरी किंवा मायानगरी म्हणून ओळखले जाते. मुंबईत स्वतःचे घर असणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र मुंबईत शहराच्या वाढत्या किमतींमुळे हे स्वप्न दूरचे वाटते. आता प्रत्येक सर्वसामान्यांचे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. मुंबईत घर असण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बोरिवली पश्चिम येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY-U) एक भव्य स्मार्ट टाऊनशिप उभारली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरातील हा पहिला आणि सर्वात मोठा परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प असणार आहे.

प्रकल्प कुठे होणार?

या प्रकल्पासाठी बोरिवलीतील गोराई आणि शिंपोली येथील तब्बल २८.८४ एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या, गोराई येथील भूखंड हा बीएसएनएल (BSNL) च्या मालकीचा आहे, तर शिंपोली येथील जमीन एमटीएनएल (MTNL) च्या अखत्यारीत येते. आता केंद्र आणि राज्य सरकारांमधील उच्चस्तरीय समन्वयातून हा अडथळा दूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जमिनी महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडे हस्तांतरित करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ७२९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कामाची व्याप्ती पाहता हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प मानला जात आहे.

कनेक्टिव्हिटी उत्तम असणार

ही टाऊनशिप केवळ घरांच्या चार भिंती नसून, ती आधुनिकतेचे प्रतीक असेल. त्याची भौगोलिक स्थिती हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. ही घरं मेट्रो स्थानकांपासून अत्यंत जवळ असल्याने उपनगरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच प्रस्तावित वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड या प्रकल्पाच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि अंधेरी या ठिकाणी कामासाठी येणाऱ्यांना अवघ्या काही मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.

सुविधांचा स्मार्ट आराखडा

केवळ घरे बांधणे हा सरकारचा उद्देश नसून, एक स्मार्ट जीवनशैली उपलब्ध करून देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटाला (LIG) डोळ्यासमोर ठेवून ४५० चौरस फुटांच्या घरांचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. या टाऊनशिपमध्ये जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था (शाळा), अद्ययावत रुग्णालये आणि विस्तीर्ण अशी खेळाची मैदाने असतील. या संकुलात विशेषतः तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र (Skill Development Center) उभारले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळण्यास मदत होईल. तसेच रहिवाशांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

महा-हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक त्रिंबक कासार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पुढील २ ते ३ महिन्यांत पार पडण्याची दाट शक्यता आहे. एकदा भूमिपूजन झाले की, पुढील ३ ते ४ वर्षांत हे संपूर्ण संकुल पूर्ण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पामुळे बोरिवली परिसरात घरांची उपलब्धता वाढून किमतींवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता केवळ कागदावर न राहता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.

Follow Us