AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

| Updated on: Aug 06, 2026 | 1:37 PM
Share

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला.

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही, तर पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. मराठा समाजाशी दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, “आज उद्धव ठाकरे यांना चांगले म्हणायची वेळ आमच्यावर आली आहे. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला. मीडियासमोर आम्ही उघडपणे भूमिका घेतली होती, पण आता तुम्हीच मराठा समाजाच्या विरोधात उभे राहत आहात.”

यावेळी त्यांनी माजी मंत्री विलास भुमरे यांचाही उल्लेख करत, “भुमरे मामा, तुम्ही सहाव्या क्रमांकावर होता, इतक्या लवकर सगळं विसरलात का?” असा सवाल केला. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मराठा समाजातील तरुणांचे नुकसान केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना थेट इशारा देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शिंदे साहेब, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? मराठा समाजाशी दुटप्पी भूमिका घेऊ नका. गरज पडली तर तुमचे सर्व लोक राजकीयदृष्ट्या पाडून टाकीन.”

दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने सरकारची भूमिका काय असणार, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

 

 

Published on: Aug 06, 2026 01:37 PM

Follow Us