AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा

Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा

| Updated on: Aug 06, 2026 | 1:58 PM
Share

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. "देवेंद्र फडणवीस साहेब, डोक्यातील हवा काढा.

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजातील काही लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला असून, मराठवाड्यातील चार नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी नेत्यांवर थेट निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. “देवेंद्र फडणवीस साहेब, डोक्यातील हवा काढा. अन्यथा पुन्हा आंदोलन उभं राहिलं, तर महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल,” असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे आणि उदय सामंत यांच्यावरही टीका केली. “तुमचे नेते आमच्या विरोधात बैठका घेत आहेत, भाषणं करत आहेत. बावनकुळे यांच्यामुळे भाजपचे नुकसान होईल. मराठा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न थांबवा,” असे ते म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. “५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले, त्याचीही तपासणी व्हायला हवी. १९९४ मध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठा समाज आपला आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय करू नका,” असे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा देत मराठा समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, सरकार पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 06, 2026 01:58 PM

Follow Us