मेणाचे पाऊच, सिगारेटचा बॉक्स अन्… मुंबई विमानतळावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, सापडलं असं काही…
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ३.१५ कोटींचे सोने जप्त केले असून या प्रकरणी एका फायनान्शियल एक्सपर्टसह दोघांना अटक केली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क (कस्टम) विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या आहेत. यामध्ये तब्बल ३ कोटी १५ लाख रुपये किंमतीचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या सोन्यामध्ये २४-कॅरेट सोन्याची धूळ आणि कच्च्या सोन्याच्या तुकड्यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण उच्च उत्पन्न गटातील वित्त व्यावसायिक (Financial Professional) असून आंतरराष्ट्रीय तणावाच्या भीतीपोटी त्याने ही तस्करी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मेणाच्या पाऊचमध्ये लपवली सोन्याची भुकटी
मुंबई कस्टम्स झोन-३ विमानतळ आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी ‘एपीआयएस’ (Advanced Passenger Information System) प्रोफाइलिंगच्या आधारे पहिली कारवाई करण्यात आली. दुबईहून स्पाईसजेटच्या विमानाने (SG 5023) मुंबईत उतरलेल्या एका संशयित प्रवाशाला अधिकाऱ्यांनी अडवले. त्याची सखोल झडती घेतली असता त्याने मेणामध्ये २४-कॅरेट सोन्याची धूळ मिसळून ती (Gold Dust in Wax) पाऊचमध्ये लपवून आणल्याचे उघड झाले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याचे निव्वळ वजन १.०२ किलो आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तात्पुरती किंमत १ कोटी ४१ लाख रुपये आहे.
सिगारेटच्या पाकिटात सोने; हाय-प्रोफाइल व्यावसायिक गजाआड
तर दुसरीकडे दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने (EK 506) आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रवासी वित्तीय क्षेत्रात कार्यरत असलेला आणि उच्च उत्पन्न गटातील व्यावसायिक आहे. या चलाख प्रवाशाने सीमा शुल्क चुकवण्यासाठी सोन्याचे बारीक कच्चे तुकडे सिगारेटच्या पाकिटांमध्ये अत्यंत चाणाक्षपणे लपवले होते. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून १.२५७ किलो वजनाचे २४-कॅरेट कच्चे सोने जप्त केले. ज्याची किंमत सुमारे १ कोटी ७४ लाख रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तस्करीमागे अमेरिका-इराण युद्धाची भीती
प्राथमिक चौकशी दरम्यान वित्तीय क्षेत्रातील आरोपी प्रवाशाने तस्करीमागे एक धक्कादायक कारण सांगितले. अमेरिका-इराण यांच्यातील वाढता संघर्ष आणि दुबईतील अलीकडील हल्ल्यांमुळे तिथली परिस्थिती अस्थिर झाली आहे. या भीतीपोटी मी दुबईतील माझी परदेशी मालमत्ता सोन्यात रूपांतरित केली. हे सोने भारतात आणताना कर आणि इतर नियामक तपासणी टाळण्यासाठी मी तस्करीचा मार्ग निवडला, असे त्याने सांगितले.
दरम्यान या दोन्ही आरोपींना सीमाशुल्क कायदा, १९६२ (Customs Act, 1962) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये केवळ मालमत्ता सुरक्षित करणे हाच हेतू होता की यामागे एखादी मोठी आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी सक्रिय आहे, याचा शोध घेण्यासाठी कस्टम्स विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.