मुंबईत एटीएसच्या हवालदाराचा मृत्यू, ‘कोरोना’ चाचणी अहवाल प्रतीक्षित

दहशतवादविरोधी पथकातील 46 वर्षीय पोलीस हवालदाराला टॉयफॉईड झाला होता. 11 मेपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Mumbai ATS Police Constable Death)

मुंबईत एटीएसच्या हवालदाराचा मृत्यू, कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षित
| Updated on: May 18, 2020 | 8:15 AM

मुंबई : मुंबईत दहशतवादविरोधी पथकाच्या नागपाडा युनिटमध्ये नियुक्त पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. टॉयफॉईडग्रस्त हवालदाराला प्राण गमवावे लागले असून त्याच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल प्रतीक्षित आहेत. (Mumbai ATS Police Constable Death)

संबंधित 46 वर्षीय पोलीस हवालदाराला टॉयफॉईड झाला होता. 11 मेपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच काल (17 मे) पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

कार्यालयात असताना त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नागपाडा मोबाईल 1 ने आधी नायर हॉस्पिटल, त्यानंतर भाटिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याना दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केलं.

मयत हवालदाराला मधुमेहाचा आजार होता. त्यांची मरणोत्तर ‘कोरोना’ तपासणी करण्यात आली असून रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना एटीएएसतर्फे पूर्ण मदत करण्यात येत असल्याचं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत कोरोनामुळे 9 पोलीस कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलाला विळखा

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1 हजार 206 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात 15 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला, ही दिलाश्याची बाब.

आतापर्यंत 125 अधिकाऱ्यांना आणि 1081 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 90 अधिकारी आणि 822 कर्मचारी अशा एकूण 912 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत.