
महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. महापालिका निवडणुकांचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला ८९ जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे तो सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा जिंकता आल्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या संघर्षाला हॉटेल पॉलिटिक्सची फोडणी मिळाली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील २९ नगरसेवक हे वांद्र्यातील आलिशान ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. या नगरसेवकांचा मुक्काम आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे. गेल्या ४३ तासांपासून हे सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार आहेत. जोपर्यंत मुंबईचा महापौर निश्चित होत नाही, तोपर्यंत ही तटबंदी कायम राहण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे निवडून आलेल्या नगरसेवकांची अधिकृत नोंदणी (Registration) करण्यासाठी त्यांना नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकण भवन येथे नेणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि सर्व नगरसेवक एकत्र राहावेत यासाठी एका विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व २९ नगरसेवकांना सोयीनुसार कडेकोट बंदोबस्तात बेलापूरला नेले जाईल. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा हॉटेलवर आणले जाईल.
काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जाऊन सर्व नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मोठा सल्ला दिला. कोणत्याही नगरसेवकाने विजयाचा उन्माद न बाळगता कामाला लागा. विरोधकांच्या टीकेला तोंडी उत्तर न देता, आपल्या प्रभागातील विकासकामांनी उत्तर द्या. जनतेमध्ये शिवसेनेची प्रतिमा उंचावेल अशा पद्धतीने आपला स्ट्राइक रेट ठेवा, असा कानमंत्र एकनाथ शिंदेंनी दिला. तसेच राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गट हा किंगमेकरच्या भूमिकेत आहे. भाजपसोबतची युती आणि महापौर पदासाठी सुरू असलेली बोलणी पाहता, आपल्या नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेने ही सावध भूमिक घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेचा पुढचा महापौर कोण आणि कोणाचा होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.