मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध
Bandra-Worli Sea Link Routes Guideline: कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक मार्गावर काही वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आता ही वाहने कोणती आहेत? जाणून घ्या...

मुंबईच्या ट्राफिकमधून वाचण्यासाठी अनेकजण कोस्टल रोड आणि बांद्रा-वरळी सी लिंकचा वापर करतात. अगदी कमी वेळात नरिमन पॅाइंट म्हणजे मुंबईत पोहोचण्यासाठी या रस्त्यांचा वापर केला जातो. हे दोन्ही रस्ते अतिशय स्वच्छ, कमी ट्राफिक आणि रुंद असलेले रस्त्ये म्हणून ओळखले जातात. आता या रस्त्यांबाबत नवे निर्बंध समोर आले आहेत. या रस्त्यांवर काही वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या वाहनांवर कायमची बंदी?
मुंबई कोस्टल रोड आणि बांद्रा-वरळी सी लिंकसाठी अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मोक्षदा पाटील यांनी कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार कोस्टल रोड आणि बांद्रा-वरळी सी लिंक मार्गावर सर्व प्रकारची मालवाहू वाहने, ट्रक, ट्रेलर, टेम्पो, मिक्सर, ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहने यांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी आहे. मात्र बेस्ट बस, एसटी व इतर प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांची अवजड वाहने यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
वेगावर देखील निर्बंदी
तसेच सर्व प्रकारची दुचाकी वाहने जसे की सायकल, मोपेड, स्कूटर, साइडकार असलेली स्कूटर आणि अपंगांसाठी मोटरसायकल, सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, जनावरांनी ओढलेल्या गाड्या जसे की टांगा, बैलगाडी, घोडागाडी, हातगाडी तसेच पादचाऱ्यांनाही या मार्गावर प्रवेशास मनाई आहे. मार्गावर सरळ भागात वेगमर्यादा ८० किमी प्रतितास, बोगद्यात ६० किमी प्रतितास आणि वळण किंवा जंक्शनवर ४० किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे. याशिवाय मार्गावर वाहने थांबवणे, प्रवासी चढवणे-उतरणे आणि फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग हा १५ ऑगस्ट २०२५ रोजीपासून कनेक्टर ब्रिजद्वारे राजीव गांधी सागरी सेतूशी जोडण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते बांद्रा टोल प्लाझा पर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या प्रवासी वाहनांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोस्टल रोड आणि सी लिंकवरील सर्व वाहिन्या, ब्रिज, अंडरपास व बोगदे १५ ऑगस्ट २०२५ मध्यरात्रीपासून दररोज २४ तास प्रवासी वाहतूकीसाठी खुले आहेत. यापूर्वी वेळोवेळी जारी केलेल्या तात्पुरत्या अधिसूचना रद्द करून आता एकत्रित अंतिम अधिसूचना लागू करण्यात आली आहे जेणेकरून वाहतूक नियमन, शिस्त पाळणे आणि वेगमर्यादा निश्चित करणे अधिक सुलभ होईल.