मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय

| Updated on: Mar 19, 2021 | 11:16 AM

कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे. (Hemant Nagrale Special Squads Mumbai Police)

मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची पुनर्रचना, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय
Hemant Nagrale
Follow us on

मुंबई : मुंबई पोलीस दलातील विशेष पथकाची लवकरच पुनर्रचना होणार आहे. यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी हा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला आहे. (Mumbai CP Hemant Nagrale Decision to close Special Squads in Mumbai Police force)

मुंबई पोलीस दलात पाच विभाग

कायदा आणि सुव्यवस्था
क्राईम
आर्थिक गुन्हे शाखा
प्रशासन
ट्राफिक

यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. मात्र आता असा प्रकार होणार नाहीत. कोणतेही विशेष पथक सुरु न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे.

क्राईम ब्रांचमध्ये अशी अनेक पथकं आहेत. ती सुरु ठेवायची की नाही, याचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सचिन वाझे सीआययूचे प्रमुख होते. त्यांनी जो प्रकार केला आहे, त्याने पोलीस दल बदनाम झालं आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांनी बदल करायचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारलाः हेमंत नगराळे

सर्वांना माहिती आहे, मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ही समस्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नेमणूक केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई पोलिसांची जी प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला येणाऱ्या दिवसात चांगलं करण्याचा प्रयत्न करणार. आमच्या मुंबई शहरामधील अधिकारी कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य, सहभाग या कार्यामध्ये लाभणार असल्याचंही हेमंत नगराळे यांनी काल आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितलं. (Mumbai CP Hemant Nagrale Decision to close Special Squads in Mumbai Police force)

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे याआधी पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत होते. तर मार्च 2021 मध्ये परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा चार्ज देण्यात आला.

संबंधित बातम्या :

 अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

होय, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली, आता पत आणि प्रतिष्ठा परत मिळवू : हेमंत नगराळे

(Mumbai CP Hemant Nagrale Decision to close Special Squads in Mumbai Police force)