तुम्ही IIT बॉम्बे कायम ठेवले म्हणून मी खूश, केंद्रीय मंत्र्याचे विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ, मनसेचा थेट इशारा

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बे नाव कायम ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषेशी संबंधित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ असताना, त्यांच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही IIT बॉम्बे कायम ठेवले म्हणून मी खूश, केंद्रीय मंत्र्याचे विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ, मनसेचा थेट इशारा
iit 1
| Updated on: Nov 26, 2025 | 12:05 PM

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठी भाषेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे. अशातच आता केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबई येथे केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटीच्या नावातील बॉम्बे हा शब्द कायम ठेवल्याबद्दल जाहीरपणे समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?

आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात आयोजित काल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह क्वांटम-तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती या विषयांवर भाष्य करत होते. याच वेळी त्यांनी आयआयटीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले. आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत,” असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

यासोबतच डॉ. जितेंद्र सिंह यांनी क्वांटम तंत्रज्ञान आणि देशातील वैज्ञानिक प्रगतीवर भाष्य केले. क्वाण्टम तंत्रज्ञानामुळे जगातील सर्वात गुंतागुंतीच्या समस्या काही क्षणांत सोडवणे आणि नवीन औषधांचा शोध लवकर पूर्ण करणे शक्य होणार आहे. यासाठी देशातील 100 अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये क्वाण्टम-प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारण्याची योजना आहे. बी. टेक अभ्यासक्रमात क्वाण्टम तंत्रज्ञान हा गौण (Minor) विषय म्हणून शिकवला जाणार असून, यासाठी एआयसीटीईने (AICTE) मान्यता दिली आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील आयआयटी आणि आयआयएससी बंगळुरू येथे क्वाण्टम कम्प्युटिंग, कम्युनिकेशन व सेन्सर क्षेत्रांत मोठे संशोधन सुरू असल्याची माहिती सिंह यांनी दिली.

यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. शिरीष केदारे यांनी क्रायोजेनिक इंजिन आणि एमआरआय मशीनसाठी वापरला जाणारा द्रवरूपी हेलियम (Liquid Helium) देशात आयात करावा लागत होता, पण आता आयआयटी मुंबईत तो तयार करण्याची प्रयोगशाळा सुरू झाल्याची माहिती दिली.

मात्र डॉ. जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेत्यांनी भाजप नेत्यांवर टीका करत, त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा समाचार घेत भाजपवर टीका केली. आय.आय.टी. बॉम्बेचे “आय.आय.टी. मुंबई” केले नाही याबद्दल मी आभार मानतो, असे निर्लज्ज आणि बेशरम विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबईत येऊन करतात. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. या आता वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ, पश्चात्ताप करा आणि नाक घासून मराठी माणसाची माफी मागा, पुढच्या वेळी डॉ. जितेंद्र सिंह मुंबईत आल्यास त्यांचा मनसेतर्फे ‘सत्कार’ करण्यात येईल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.