
मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबई लोकल आणि स्टेशन परिसरात विनयभंग, अश्लील चाळे याप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातच आता सीएसएमटी-अंबरनाथ धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकांवरील आणि लोकल ट्रेनमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अत्यंत संतापजनक कृत्य केले. तिची लोकल ट्रेन सीएसएमटीवरून सुटताच या दोन्ही आरोपींनी महिला प्रवाशाची छेड काढण्यास आणि तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा धक्कादायक प्रकार पाहता महिलेने तातडीने आपल्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. त्यांची ट्रेन उल्हासनगर रेल्वे स्थानकावर थांबल्यावर महिलेचे नातेवाईक आणि संतप्त झालेले अन्य सहप्रवासी यांनी या दोन्ही तरुणांना पकडले.
या संतापलेल्या जमावाने आरोपींना चांगलाच चोप देऊन त्यांना धडा शिकवला. यानंतर या दोन्ही आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या कल्याण जीआरपी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. कल्याणच्या दिशेकडील फलाट क्रमांक 3वरील ब्रिजवर चढत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. गजबजलेल्या रेल्वे स्थानकात दिवसाढवळ्या घडलेल्या या लाजिरवाण्या प्रकारामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी (G.R.P.) तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी सुनील पारकर (वय ५८) या आरोपीला दिव्यातून अटक केली आहे. तसेच ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिलांच्या प्रवासावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
त्यासोबत गोवंडी रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका बाकावर बसलेल्या तरुणीला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसलेला एक तरुण सतत तिच्याकडे एकटक पाहत होता. धक्कादायक बाब म्हणजे काही मिनिटांनी त्याने या तरुणीसमोर अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. तरुणीने सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणाचे वर्तन अधिक विचित्र आणि घाणेरडे होऊ लागले. शेवटी, संताप अनावर झालेल्या तरुणीने मोठे धाडस दाखवत त्या तरुणाजवळ जाऊन त्याला जाब विचारला. ‘का बघतोयस? हे काय हावभाव करत होतास? असे विचारुन त्या तरुणीने त्याच्या कानशिलात लगावली.
दरम्यान या तिन्ही घटनांमुळे मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षित प्रवासावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकलच्या डब्यात आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकांवरही महिलांना छेडछाड, अश्लील हावभाव आणि विनयभंगाचे प्रसंग सामोरे जावे लागत आहेत. रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून जोर धरू लागली आहे.