Mumbai Local Mega Block : पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल अंधेरीपर्यंत सुरु, मध्य-हार्बर रेल्वेची स्थिती काय?

पश्चिम रेल्वेने माहिम आणि वांद्रे स्थानकांदरम्यानच्या पुलाच्या मजबुतीकरणासाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे ३३४ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Local Mega Block : पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल अंधेरीपर्यंत सुरु, मध्य-हार्बर रेल्वेची स्थिती काय?
mumbai local प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 13, 2025 | 7:45 AM

पश्चिम रेल्वेवरील माहिम आणि वांद्रे या स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाचे मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. या कामासाठी शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री साडेनऊ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुलाच्या गार्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या सर्व लोकल या अंधेरीपर्यंत सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत.

पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे ३३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी ११० विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने केले आहे. पश्चिम रेल्वेवरील या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर माहिम ते वांद्रेदरम्यान सुरू असणाऱ्या मेगाब्लॉकमुळे विरारहून चर्चेगेटकडे जाणाऱ्या सकाळच्या सर्व लोकल अंधेरीपर्यंत सुरू आहे. सध्या अंधेरीपर्यंत सुटणाऱ्या सर्व धिम्या लोकल या १० ते १५ मिनिटाने उशिराने धावत आहेत. तर विरारहून सकाळी ५.५० ला सुटणारी अंधेरी स्लो लोक ही ५.५९ ला सुटली. तसेच शुक्रवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या मेगाब्लॉकमुळे ३३४ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पुलाच्या गर्डर च्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेची स्थिती काय?

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.०० वा. ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटीमधून सकाळी १०.४८ वा. ते दुपारी ०३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन मार्गावर वळवल्या जातील. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.

त्यानंतर पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मध्य रेल्वेवरील ब्लॉकदरम्यान मश्चिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत. तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.१९ वा. ते दुपारी ०३.२९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सर्व लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि आणि मशीद या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे उपलब्ध राहणार नाहीत.