Mumbai Local Mega Block Update : रविवारचा मेगाब्लॉक रद्द, पण रात्रीचे हाल; शेवटची लोकल कधी?

नीट परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा रविवारचा दिवसाचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मुख्य, ट्रान्स-हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक येथे वाचा.

Mumbai Local Mega Block Update : रविवारचा मेगाब्लॉक रद्द, पण रात्रीचे हाल; शेवटची लोकल कधी?
mumbai local
| Updated on: May 02, 2026 | 1:06 PM

मुंबईकरांची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नीट (NEET UG) परीक्षेसाठी बसणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने उद्या रविवारी ३ मे रोजी दिवसा घेण्यात येणारा नियोजित मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र, रेल्वेच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी देखभालीसाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री मुख्य मार्ग, ट्रान्स-हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा आणि पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवर ब्लॉक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ वाजेपर्यंत अप व डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्रीच्या या ब्लॉकमुळे मशीद, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.

या ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१६ वाजता (सीएसएमटी ते टिटवाळा) ही सुटेल. तर ब्लॉकनंतर पहिली गाडी रविवारी पहाटे ५.०७ वाजता (सीएसएमटी ते कसारा) ही सुटेल.

ट्रान्स-हार्बर मार्गावर शेवटची लोकल कधी?

ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ या ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक कालावधीत सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यानची अप आणि डाउन वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ब्लॉकपूर्वी शेवटची गाडी ठाणे ते पनवेल या मार्गावर रात्री ११.१४ वाजता असेल. तर वाशी-ठाणे या मार्गाव रात्री १०.४५ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली गाडी ठाणे-पनवेल (पहाटे ५.१२), पनवेल-ठाणे (पहाटे ४.३३) अशी असेल.

पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेट्रो-६ प्रकल्पाच्या स्टील गर्डर लाँचिंगसाठी पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत सहाव्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. तसेच अप जलद आणि पाचव्या मार्गावर पहाटे १ ते ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. परिणामी सहाव्या मार्गावरील सर्व गाड्या बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लांब पल्ल्याची बरौनी-बांद्रा टर्मिनस अवध एक्स्प्रेस ३० मिनिटे उशिराने धावेल.

दरम्यान रविवारी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवसा मेगाब्लॉक न घेतल्याने रेल्वे सेवा सुरळीत असली तरी, रात्रीच्या ब्लॉकमुळे वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी योग्य ते नियोजन करावे. तसेच पश्चिम रेल्वेवर सकाळी ७:३० पर्यंत काम चालणार असल्याने त्या मार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करणे सोयीचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us