
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वेने एक मोठा बदल केला आहे. मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने आता सर्व डिजिटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी रेल वन’ (Rail One) हे नवीन अधिकृत ॲप लाँच केले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेले UTS मोबाईल ॲप आता इतिहास जमा झाले आहे. तसेच त्यावरील पास काढण्याची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकल प्रवाशी हे UTS मोबाईल ॲपद्वारे तिकीट किंवा पास काढत होते. UTS मोबाईल ॲपद्वारे पास काढणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी होती. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेल्वेने बदलेल्या नियमामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. आता यानंतर अनेक रेल्वे प्रवाशांना जुन्या पासचे काय असा प्रश्न पडला आहे. आता याबद्दल रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
काही प्रवाशांनी UTS ॲपवरून आधीच मासिक किंवा त्रैमासिक पास काढले आहेत. अशा प्रवाशांच्या मनात यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या प्रवाशांनी UTS ॲपवरून आधीच पास काढलेले आहेत, त्यांचे पास अद्याप वैध (Valid) आहेत. जोपर्यंत तुमचा जुना पास संपत नाही, त्याची Expiry Date होत नाही तोपर्यंत तुम्ही तो पूर्वीप्रमाणेच वापरू शकता. जर तुम्हाला टीसीने पासबद्दल विचारल्यास तुम्ही तो पास दाखवू शकता. तो पास ग्राह्य धरला जाईल.
पण एकदा का जुन्या पासची मुदत संपली की, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला अनिवार्यपणे Rail One ॲपच वापरावे लागेल. ‘वन नेशन, वन ॲप’ या संकल्पनेनुसार रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. आता मुंबई लोकलचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास केवळ रेल वन या एकाच ॲपवर उपलब्ध असतील. या ॲपमध्ये तिकीट बुकिंगसोबतच ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि आर-वॉलेटची (R-Wallet) सुविधाही देण्यात आली आहे. प्रवाशांनी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दीपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून Rail One ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे.