Mumbai Local: मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत! गाड्या तासभर जागेवरच उभ्या; प्रवाशांना रुळांवरून चालण्याची वेळ, काय घडलंं?

Central Railway Disruption: मुंबई लोकलचा खोळंबा झाल्याचे दिसून आले आहे. भांडुप-कांजूरमार्गदरम्यान रेल्वे रुळात बिघाड झाला आहे. यामुळे पाऊण तास गाड्या एकाच जागी उभ्या आहेत.

Mumbai Local: मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत! गाड्या तासभर जागेवरच उभ्या; प्रवाशांना रुळांवरून चालण्याची वेळ, काय घडलंं?
Bhandup-Kanjurmarg Rail Track Glitch Brings Train Services to a Halt
| Updated on: Nov 20, 2026 | 11:32 PM

मुंबईकरांचा घरी परतण्याचा प्रवास आज चांगलाच त्रासदायक ठरला आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भांडुप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या जवळपास पाऊण तास एकाच ठिकाणी उभ्या राहिल्या. तर काही गाड्या एक तासाहून अधिक काळ रखडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या सहाव्या आणि चौथ्या मार्गिकेवरील वाहतुकीला या बिघाडाचा फटका बसला. या दोन्ही मार्गिकांवरील रेल्वे गाड्या बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून राहिल्या. विशेष म्हणजे सहाव्या मार्गिकेवर धावणारी भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस तब्बल एक तासाहून अधिक काळ एकाच ठिकाणी उभी होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल वाहतुकीचेही वेळापत्रक कोलमडले.

Loading...

मध्य रेल्वेवरील जलद अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर आली. ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्याने प्रवाशांना पुढील प्रवास कसा करायचा, असा प्रश्न पडला. गाड्या बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या असल्याने काही प्रवाशांनी अखेर लोकलमधून उतरून रेल्वे रुळांवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून आली.

मात्र, रेल्वे रुळांवरून चालणे अत्यंत धोकादायक असल्याने प्रवाशांनी अशा प्रकारे प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येते. या बिघाडामुळे भांडुप, कांजूरमार्ग आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने स्थानकांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घरी जाण्याच्या घाईत असलेल्या नोकरदार वर्गाला ताटकळत राहावे लागले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीत बिघाड झाल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us