बापरे! मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक, 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द, नेमकं कारण काय?

| Updated on: Nov 20, 2022 | 9:50 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

बापरे! मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक, 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द, नेमकं कारण काय?
Follow us on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आजपासून मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. सीएसएमटी आणि मशीद बंदर रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या धोकादायक कर्नाक पुलाला पाडण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील तब्बल 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वडाळा रोड विभागात अनेक मार्गांवर हे काम केले जाईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

ब्रिटश काळातील तब्बल 154 वर्षांचा जुना कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामाचं कार्य रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर सुरु झालंय. त्यासाठीच हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

पुलाचा गर्डर हटवण्याचं काम सुरु करण्यात आलंय. त्यासाठी मोठमोठ्या क्रेन घटनास्थळी आणण्यात आल्या आहेत. तसेच शेकडो मजूर घटनास्थळी दाखल झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीय.

हे सुद्धा वाचा

पुलाच्या पाडकामामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा रेल्वे स्थानक या दरम्यान तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे 1800 लोकल फेऱ्यांवर तसेच 36 लाख रेल्वे प्रवाशांवर परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही परिणा होणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर 27 तासांचा तर हार्बर रेल्वे मार्गावर 21 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ 2018 मध्ये गोखले पूल कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी कर्नाक पूल धोकायदायक असल्याची घोषणा करण्यात आली होती. आयआयटी पवईच्या तज्ज्ञांनी याबाबत अंदाज वर्तवला होता. त्यांनतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता या पुलाच्या पाडकामाला मुहूर्त मिळाला आहे.

मशीद बंदर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे गाड्या पोहोचू शकतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थनकापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त बसेसचं नियोजन बेस्ट बस प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्यासोबतच भायखळा परिसरातही अतिरिक्त गाड्या असणार आहे. वाहतूक पोलीस, रेल्वे पोलीस, महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी एकत्रितपणे याबाबतचं नियोजन केलंय.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध पत्रकातून पुलाच्या पाडकामाबाबत सविस्तर माहिती दिलीय. मध्य रेल्वे कर्नाक ब्रिज डिसमेंटलिंगसाठीच्या 27 तासांच्या ब्लॉक दरम्यान शॅडो ब्लॉकमध्ये सुमारे 900 तासांइतके काम करेल. शॅडो ब्लॉकचे काम नो ट्रेन झोनमध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड दरम्यान केले जाईल. शिवाजी महाराज टर्मिनस -भायखळा विभागात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वडाळा रोड विभागात अनेक मार्गांवर हे काम केले जाईल, रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

27 तासांचा ब्लॉक हा मेगाब्लॉक आज रात्री अकरा वाजेपासून सुरु झाला असून तो सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे. हा मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद दरम्यानच्या सर्व सहा लाईन, 7वी लाईन आणि यार्डवर परीचालीत केला जाईल.

27 तासांच्या मेगाब्लॉक दरम्यान काय कामं केली जातील?

या ब्लॉकचा पुरेपूर फायदा घेऊन, शॅडो ब्लॉक्स चालवले जातील ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे ९०० तासांची बचत करता येईल (अभियांत्रिकीचे ५०५ तास, OHE चे २३५ तास आणि S&T चे १६० तास). त्याचबरोबर सुमारे २००० कामगार शॅडो ब्लॉकमध्ये या विभागाची देखभाल करतील. सहा टॉवर वॅगन आणि अभियांत्रिकी यंत्रसामग्रीची १० वाहने वापरली जातील.

ट्रॅक नूतनीकरण २.४ किमीचे, १ किमीचे मॅन्युअल डीप स्क्रीनिंग, ३०० स्लीपर बदलणे आणि इतर कामे जसे की प्लेन ट्रॅक टँपिंग, टर्नआउट टँपिंग, स्विच रिप्लेसमेंट, टर्नआउट्स आणि ट्रॅकचे मॅन्युअल लिफ्टिंग, सिग्नल, लोकेशन बॉक्स, ट्रॅक वायर, जंपर्स बदलणे , पॉइंट मशीन रॉडिंग आणि केबल मेगरिंग इत्यादी कामे शॅडो ब्लॉकमध्ये केली जातील. 23 बीआरएन आणि 2 इएमयू चा समावेश असलेल्या मक स्पेशलद्वारे ५००० घनमीटर गाळ काढला जाईल.

प्रवाशांसाठी सुविधा

ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. हे हेल्पडेस्क तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून आरपीएफ च्या सहाय्याने चालवले जातील. अतिरिक्त आरक्षण / रद्दीकरण काउंटर महत्वाच्या स्थानकांवर उघडले जात आहेत आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त एटीव्हिएम सुविधा मदतनीस सेवेत असतील.

याशिवाय शॉर्ट ओरिजिनेशन/टर्मिनेशन, मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत उद्घोषणा केल्या जात आहेत. ब्लॉकची माहिती आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात एसएमएसद्वारे आणि मध्य रेल्वेच्या ट्विटर, फेसबुक, कू आणि इंस्टाग्राम सारख्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत.

ठाण्यात सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॉक

दुसरीकडे ठाण्यात कोपरी ब्रिजवर गर्डर टाकण्याचं काम सुरु झालंय. रस्ता रुंदीकरणासाठी संबंधित काम सुरुय. या कामासाठी तब्बल सात तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे सकाळी 6 वाजेपर्यंत ठाण्याहून मुंबईकडे आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक बंदच राहणार आहे. कोपरी पुलावर मोठमोठ्या क्रेन आणण्यात आल्या आहेत. या क्रेनच्या साहाय्याने गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे.