Mumbai Local Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल दीड तास उशिराने, नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकात तांत्रिक बिघाड आणि रविवारच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. गाड्या १ ते दीड तास उशिराने धावत आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

Mumbai Local Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल दीड तास उशिराने, नेमकं काय घडलं?
mumbai local
| Updated on: May 24, 2026 | 8:14 AM

ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कसारा-कल्याण मार्गावरील खडवली स्थानकात पहाटे मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यातच आज रविवार असल्याने रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतला आहे. या मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा आधीच उशिराने धावताना पाहायला मिळत आहे. एकीकडे झालेला तांत्रिक बिघाड आणि दुसरीकडे लोकल रद्द यामुळे तब्बल एक ते दीड तास लोक उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच याचा मोठा फटका चाकरमानी आणि पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

खडवली स्थानकात बिघाड; अप-डाऊन लोकल सेवा कोलमडली

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास खडवली स्थानकात अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाचा सर्वाधिक फटका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या अप मार्गाला बसला आहे. कल्याण आणि कसारा या दोन्ही मुख्य मार्गांवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या मार्गावरील फास्ट आणि स्लो दोन्ही लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरु आहेत. यामुळे लोकल गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.

लोकल सेवा विस्कळीत झाल्याने ऐन सुट्टीच्या दिवशी अत्यावश्यक कामासाठी आणि फिरायला बाहेर पडलेल्या प्रवाशांना तासनतास स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. सध्या रेल्वेचे पथक युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत असले तरी लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.

मेगा ब्लॉकमुळे लोकल सेवा अधिक संथ; गाड्या मार्ग बदलून धावणार

तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा आधीच विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेने आज घेतलेल्या अभियांत्रिकी मेगा ब्लॉकमुळे लोकलचा वेग अधिकच मंदावला आहे. सध्या स्लो ट्रॅकवरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आला आहे. सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन स्लो गाड्या माटुंगा आणि मुलुंडदरम्यान फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. तसेच ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान फास्ट ट्रॅकवर धावतील.

या बदलामुळे मेन लाईनवरील गाड्या नेहमीच्या वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. या ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नसल्याने येथील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे.

हार्बर लाईनवरील लोकल सेवा ६ तास पूर्णपणे स्थगित!

लोकल विस्कळीत होण्याचा सर्वात मोठा फटका हार्बर लाईनच्या प्रवाशांना बसला आहे. सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणारी तसेच येणारी लोकल वाहतूक सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवल्या जात आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून गाड्या पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी लागोपाठच्या फेऱ्या रद्द झाल्याने डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि कुर्ला यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची पाय ठेवण्यासही जागा नसून प्रचंड गर्दी झाली आहे.

Follow Us