काचेची डबी, पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा अन् 11 लाखांचे दागिने लंपास; मुंबईत हादरली

मुंबईतील माहिम येथे एका कुटुंबाची पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाचा धाक दाखवून ११ लाखांची फसवणूक झाली. आरोपी कादरीने धार्मिक श्रद्धांचा गैरफायदा घेत, सोन्याचे दागिने दुप्पट होतील असे आमिष दाखवले. महिलांकडून दागिने घेऊन तो फरार झाला. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

काचेची डबी, पैगंबरांचा वंशज असल्याचा दावा अन् 11 लाखांचे दागिने लंपास; मुंबईत हादरली
gold theft
| Updated on: Nov 25, 2025 | 9:10 AM

पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाचा धाक दाखवून मुंबईतील माहिम परिसरात एका कुटुंबाची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी आरोपीने कुटुंबातील महिलांचा धार्मिक श्रद्धांवर विश्वास संपादन करून त्यांच्याकडून दागिने घेऊन पळ काढला. माहिम पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिम पोलिस ठाणे परिसरात राहणाऱ्या अन्सार अहमद अब्दुल गनी यांनी पोलिसात एक तक्रार दाखल केली आहे. अन्सार अहमद अब्दुल गनी हे माहिमचे मूळ रहिवासी आहेत. या फसवणुकीची सुरुवात २०२२ मध्ये झाली. अन्सार आणि त्यांचा भाऊ इसरार फारुकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यावर एका व्यक्तीशी म्हणजेच कादरीशी भेट झाली. यावेळी कादरीने मी पैगंबर मोहम्मद यांचा वंशज आहे. माझ्याकडे त्यांचे पवित्र केस आहेत, अशी बतावणी केली. यानंतर दोन्ही भावांचा कादरीवर विश्वास बसला. त्यांनी त्याला माहिम येथील आपल्या घरीही बोलावले.

कादरी घरी आला तेव्हा तो सोबत एका काचेच्या डब्ब्यात एक केस घेऊन आला होता. त्यावेळी त्याने तो पैगंबरांचा असल्याचे सांगितले. त्याने त्या डब्ब्यासोबत काही विधी केले आणि ती डबी घरातील कपाटात गुप्तपणे ठेवण्यास सांगितले. यावेळी कादरीने दोन्ही भावांना स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत ही डबी उघडायची नाही किंवा कपाटातून बाहेर काढायची नाही. काही दिवसांनी त्याचे दोन्ही भाऊ बाहेर असताना कादरी पुन्हा त्यांच्या घरी आला. यावेळी त्याने दोन्ही भावांच्या पत्नींना भेटून सांगितले की, जर त्यांनी आपले सर्व दागिने त्या पवित्र डबीजवळ ठेवले, तर ते दागिने दुप्पट होतील आणि घरात प्रचंड पैसा वाढेल.

कादरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धार्मिक श्रद्धा आणि अधिक संपत्तीच्या आमिषाने दोन्ही महिलांनी सुमारे ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्या डबीजवळ ठेवले. त्यानंतर कादरीने काही विधी करायचे आहेत, असे सांगून महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. महिला बाहेर जाताच कादरीने कपाटातील दागिने काढून पळ काढला.

कादरीचा शोध विशेष पथक

काही दिवसांनंतर महिलांनी या घटनेची माहिती त्यांच्या पतींना दिली. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांनी माहिम पोलीस स्टेशन गाठून कादरीविरोधात तक्रार दाखल केली. माहिम पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपी कादरीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.