Mumbai Mayor 2026 : मुंबई महापौर-उपमहापौरपदाची अखेर घोषणा, कोणाची वर्णी?

मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. भाजप नेतृत्वाने अनुभवी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे.

Mumbai Mayor 2026 : मुंबई महापौर-उपमहापौरपदाची अखेर घोषणा, कोणाची वर्णी?
bmc mayor
| Updated on: Feb 07, 2026 | 11:00 AM

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. भाजपच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून या नावाची अधिकृत घोषणा केली. या ऐतिहासिक निवडीमुळे तब्बल २९ वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडींची वर्णी लागली आहे

पक्ष कार्यालयात हालचालींना वेग: नेत्यांची उपस्थिती

आज सकाळी महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सत्तेचे अंतिम समीकरण आणि पदांच्या वाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर उपस्थित आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले उपस्थित आहेत.

शिंदे गट किंगमेकर

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला उपमहापौरपद मिळाले आहे. या पदासाठी शिंदे गटाकडून शीतल म्हात्रे किंवा अमेय घोले यांच्या नावांची चर्चा होती. मात्र मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडींची वर्णी लागली आहे.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल (२०२६ निवडणूक निकाल)

मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. सत्तेसाठी आवश्यक असलेली ११८ (मॅजिक फिगर ११४) ही संख्या महायुतीकडे आहे.

  • भाजप: ८९ जागा
  • शिवसेना (शिंदे गट): २९ जागा
  • शिवसेना (ठाकरे गट): ६५ जागा
  • काँग्रेस व इतर: २५ जागा

निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम

मुंबई महापालिकेतील महापौर निवडीसाठीच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार आज ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येतील. तर येत्या ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा पार पडेल. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडून मुंबईच्या नवीन महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.