
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचा सस्पेन्स आता लवकरच संपणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या देखरेखीखाली असलेल्या मुंबई महापालिकेत अखेर महापौर विराजमान होणार आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईचा नवा महापौर आणि उपमहापौर निवडला जाणार आहे. या निवडीसाठी पालिकेचे ऐतिहासिक महापौर दालन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.
मुंबई महापालिकेतील महापौर निवडीसाठीच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार येत्या ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येतील. तर येत्या ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा पार पडेल. यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडून मुंबईच्या नवीन महापौरांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे २९ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे. यानुसार भाजपला ८९ जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाने ६५ जागा जिंकल्या असून काँग्रेस व इतर यांना एकत्रित मिळून २५ जागांवर विजय मिळवला आहे.
सध्या भाजप आणि शिंदे गट मिळून महायुतीकडे ११८ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ११४ ही मॅजिक फिगर आवश्यक असते. महायुतीकडे असलेला हा आकडा मॅजिक फिगरपेक्षा जास्त आहे. यामुळे महायुतीचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यंदाचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमधील अनुभवी महिला नगरसेविकांच्या नावांची चर्चा जोरात सुरू आहे. यामध्ये शितल गंभीर देसाई, रितू तावडे, तेजस्वी घोसाळकर (भाजप), हर्षिता नार्वेकर, राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने किंगमेकरची भूमिका बजावत उपमहापौर पदावर आपला दावा सांगितला आहे.
महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. ऐतिहासिक महापौर दालनाची रंगरंगोटी, स्वच्छता आणि फर्निचरची डागडुजी पूर्ण झाली आहे. सध्या पालिकेत पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.