
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सध्या सर्व पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवतीर्थावर झालेल्या सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचारांचे तुफान आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, ही सभा गेम चेंजर सभा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले की, विरोधकांना वाटत असेल की वारंवार सभा घेऊन ते वातावरण फिरवू शकतील, पण त्यांना हे माहित नाही की ठाकरेंना सतराशे साठ सभा घेण्याची गरज नाही. कालची शिवतीर्थावरील सभा ही ‘गेम चेंजर’ ठरली असून या एकाच सभेने परिवर्तनाची लाट आणली आहे. काल शिवतीर्थावर झालेली गर्दी ही केवळ माणसांची गर्दी नव्हती, तर तो संताप होता. महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी माणूस कालच्या भाषणांकडे डोळे लावून बसला होता. एकाच सभेने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. शिवतीर्थ ओसांडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण, यांचे विचार फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकले नाही, तर महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते. त्यांनी ते पाहिलं. कालचं भाषण तुफान होतं. आपला विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरेंनी सभेत सादर केलेल्या अदानी समूहाच्या प्रेझेन्टेशनचा उल्लेख केला. राज ठाकरेंनी काल अदानीसंदर्भात जे प्रेझेन्टेशन केले होते. ते याआधी देशातील इतिहासात कोणीही केलेले नाही. काल जे वास्तव समोर आले ते धक्कादायक आहे. संपूर्ण देश एकाच उद्योगपतीच्या ताब्यात दिला जातोय का? असा प्रश्न पडतोय. मुंबईची अस्मिता असलेले विमानतळ नवी मुंबईला हलवण्याचे कारस्थान असो किंवा धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली जमिनी लाटणे असो, हे सर्व राज ठाकरेंनी पुराव्यासह मांडले आहे. यामुळे ‘सब भूमी गौतम अदानी की’ हे आता स्पष्ट झाले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात नाही. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच सांगितले की मालक जगला तरच कामगार जगेल. गुंतवणूक आली तरच राज्याचा विकास होईल. पण भाजप जे करत आहे त्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही. ही सरळ सरळ ‘वन विंडो सिस्टीम’ वापरून केलेली लूट आहे. मुंबईचे महत्त्व कमी करून तिची आर्थिक राजधानी ही ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले.
यावेळी संजय राऊत यांनी यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामान्य शिवसैनिकांच्या १०-१२ लाखांच्या व्यवहारांचा तपास करणाऱ्या यंत्रणांना भाजप नेत्यांची १२४ कोटींची संपत्ती का दिसत नाही? पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांची चौकशी कधी होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.