
कॉलेज आणि घर एवढंच विश्व असलेल्या प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या करण्यात आल्याने सर्वचजण हादरून गेले आहेत. कुणाशीही कधीही वाद न घालणारा, शांत आणि मितभाषी असलेल्या प्राध्यापकाच्या बाबत असं होऊच कसं शकतं? असा सवाल केला जात आहे. आलोक सिंग यांच्या हत्येचं वृत्त ऐकून त्यांचे मित्र मंडळी आणि नातेवाईकही सुन्न झाले आहेत. त्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासा झाला आहे. काय बोलावं? तेच कळत नाही. कंठ दाटून गेलाय, शब्द फुटत नाही, फक्त डोळ्यात पाणी आहे… अशी अवस्था या नातेवाईकांची झाली आहे. मात्र, या नातेवाईकांनी पोलिसांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
आलोक सिंग हे महाविद्यालयात प्राध्यापक होते. अत्यंत हुशार आणि मनमिळावू प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यार्थी प्रिय असे ते प्राध्यापक होते. पण मालाड रेल्वे स्थानकात भर गर्दीत त्यांचा खून झाल्याने त्यांचे नातेवाईक हादरून गेले आहेत. आलोक यांच्या कुटुंबीयांनी या हत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते? पोलीस कुठे होते? रेल्वे स्थानकावर पोलिसांसाठी एक बेंच असतो, त्या बेंचवर पोलीस नव्हते, मग बेंच कशासाठी ठेवले? आरोपी सर्वांसमोरून पळून जात होता, त्याला कुणीच कसं आडवलं नाही? आलोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत का मिळाली नाही? असे सवाल प्रवासी आणि आलोक यांचे नातेवाईक करत आहेत.
अत्यंत साधा माणूस
आलोक सिंग यांच्या एका नातेवाईकांना तर आलोक यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. तोंडातून शब्दही फुटत नव्हते. डोळ्यात पाणी होते. या नातेवाईकाने तर पोलिसांवरच संताप व्यक्त केला आहे. आलोक सिंग हा अत्यंत साधा माणूस होता. आलोक मितभाषी होते. कधीच कुणाशी भांडले नाही. ते सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक होते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. त्यांचं कुणाशी भांडण होऊच कसं शकतं? असा सवाल या नातेवाईकाने केला आहे.
पोलिसांना निलंबित करा
आमची एकच मागणी आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडले पाहिजे. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, रेल्वे स्थानकावर उघडपणे चाकूने वार करून आरोपी पळून जातो आणि रेल्वे पोलिसांनी काहीही केले नाही. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना प्रथम निलंबित केलं पाहिजे. पोलिसंना आपली ड्युटी करता येत नाही का? असा संतप्त सवाल या नातेवाईकाने केला आहे.
काय घडलं?
काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मालाड रेल्वे स्थानकात ट्रेन आलेली असताना आरोपीसोबत धक्का लागल्यावरून आलोक सिंग यांची शाब्दिक चकमक झाली. नंतर उतरत असताना आरोपीने बॅगेतील लोखंडी चिमटा काढला आणि आलोक सिंग यांच्या पोटात खुपसून पळून गेला. पोटात चिमटा आरपार गेल्याने आलोक सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.